निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी जनतेच्या खिशावर दरोडा, इंधनाच्या दरवाढीवरून अखिलेश यादव यांचा भाजपवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी इंधनाच्या वाढत्या किमतींवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इंधनाचे दर वाढवून भाजप नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा खर्च सर्वसामान्य जनतेकडून वसूल करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. X वर पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत अखिलेश यादव यांनी भाजपच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, इंधनाच्या बेसुमार वाढणाऱ्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडे आता एकच मार्ग उरला आहे, तो म्हणजे त्यांचा जुना पोत्यातून चोरी करण्याचा फॉर्म्युला. याचाच अर्थ, इंधनाचे दर वाढवण्याऐवजी थेट एक लिटरमधील तेलाचे प्रमाणच कमी करून टाकायचे.

तेलाचे दर आणि भाजपचे कमिशन यांचा थेट संबंध असल्याचे सांगत अखिलेश यादव यांनी सरकारवर कमिशनखोरीचा थेट आरोप केला. बाजारात इंधनाचे दर जितके वाढतील, तितकेच भाजपचे कमिशनही वाढेल, असे ते म्हणाले. तसेच स्वतःची आणि आपल्या लोकांची तिजोरी कधीही रिकामी राहता कामा नये, हाच भाजपचा एकमेव सिद्धांत असून त्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा घालण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.