
शिक्षणाचा श्रीगणेशा ज्या खडूने केला जातो त्याच खडूवर श्री गणेशा रेखाटण्याचा छंद रत्नागिरीतील दीप्तेश दिलीप पाटील या तरुण कलाशिक्षकाने जोपासला आहे. खडू अतिशय ठिसूळ असतो. पण त्याच ठिसूळ खडूवर एकाग्रतेने दीप्तेश यांनी एक सेमीपासून पाच मिमी आकाराचे बाप्पा कोरले आहेत.
दीप्तेश पाटील यांनी एकदा नॅनो गणपती केल्याची बातमी वाचली आणि त्यांच्या डोक्यात चक्रे फिरू लागली. यापेक्षाही कमी आकाराची गणेशमूर्ती तयार करण्याचे त्यांनी ठरवले. सुरुवातीला त्यांनी खडूवर कोरीवकाम करत एक सेंमीचा बाप्पा साकारला. त्यानंतर पाच मिमीचा बाप्पा खडूमध्ये कोरला. पुढे मग त्याच्या कलाविष्काराला मार्ग मिळू लागला. मग त्यांनी दोन खडूवर अष्टविनायक कोरले. हे अष्टविनायक अतिशय सुबकपणाने रंगवले आहेत. एखाद्या खांबावर कोरीवकाम करावे अशा पद्धतीने त्यांनी खडूवर अष्टविनायक रेखाटले आहेत. याशिवाय त्यांनी तूरडाळीवर 3.4 मिमी आकाराचा आणि मूगडाळीवर दोन मिमी आकाराचा बाप्पा साकारला आहे.
खडूवरील कोरीव कामाचा छंद जोपासत नवनवीत गोष्टी खडूवर कोरण्याकडे त्यांचा कल असतो. आणि हे कोरीवकाम त्यांनी आता आपल्यापुरते न ठेवता यू टयूब चॅनेलच्या माध्यमातून इतरांनाही कोरीव कामाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
अविष्कार संस्थेमध्ये कलाशिक्षकाची नोकरी करत असताना त्यांनी खडूवरील कोरीव कामाचा छंद जोपासला. 2019च्या क्रिकेट विश्वचषकाची प्रतिकृती त्यांनी खडूमध्ये रेखाटली. त्याचबरोबर श्री साईबाबा, महालक्ष्मी, रिक्षा, ट्रक, रेल्वे, कार, लहान मुल आणि आयफेल टॉवर त्यांनी खडूमध्ये कोरला आहे. पेन्सीलच्या टोकावरही गणेशमूर्ती त्यांनी कोरली आहे.


























































