
सामना ऑनलाईन । नगर
नगरमध्ये सोनाराला लुटणाऱ्या टोळीतील 5 जणांच्या मुसक्या नगरच्या कोतवाली पोलिसांनी आवळल्या आहेत. शुक्रवारी या दरोडेखोरांनी सायकलवरून घरी जात असलेल्या संजीत मंडल आणि त्यांच्या भाच्याला रस्त्यात मारहाण करून त्यांच्याकडील नऊ तोळ्याचे सोन्याचे दागीने लुटले होते. सचिन वाळवे (20) , कमलेश नवले (22), अक्षय दातरंगे (19), परेख खराडे आणि अमोल लोळगे अशी आरोपींची नावं आहेत.
नगरमधल्या रेणावीकर मार्केटमधील संजीत मंडल यांचे सोन्याचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. 30 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास संजीत व त्यांच्या भाचा दुकानातून घरी जात होते. त्यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या दारोडेखोरांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी संजीत मंडल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेला 2 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपिंनी लुटलेले दागिन अमोल लोळगे या सराफाला विकले होते. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मिना उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

























































