दलित चळवळीतील ढाण्या वाघ गंगाधर गाडे यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ, नामांतर प्रणेते, माजी परिवहन राज्यमंत्री तथा पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे (८७) यांचे आज शनिवारी पहाटे ४ वाजता दीर्घ आजाराने येथील एशियन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील धगधगता ज्वालामुखी शांत झाला आहे.

गंगाधर गाडे हे दलित चळवळीतील मोठे नाव होते. त्यामुळे गंगाधर गाडे आणि दलित चळवळ हे एक समीकरण झाले होते. कारण आजच्या सर्व आंबेडकरी चळवळीतील पुढाऱ्यांमध्ये गंगाधर गाडे आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास ४७ दलित वसाहती त्यांनी वसवल्या. १९७७ मध्ये विद्यापीठाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा पहिला ठराव मांडला आणि तब्बल १७ वर्ष या आंदोलनाची धग कायम ठेवली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा ताफा अडवण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांच्या कार्यकर्तीने आपल्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीपुढे झोकून गाडी अडवली होती. अशा कार्यकर्त्यांनी फ़ौजअसणारे गाडे हे आंबेडकरी चळवळीतील एकमेव नेते होते. त्यांची अभ्यासपूर्ण भाषण करण्याची शैली आणि आक्रमक स्वभाव भल्याभल्यांना घाम फोडत असे. कुठलेही काम पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावा करण्याची हातोटी गाडे यांच्याकडे होती.

मंत्रालयात परिवहन राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आयोजित मंत्रालयीन पत्रकार परिषदेत अभ्यासपूर्ण उत्तरे देणारे गाडे हे पहिले मंत्री असल्याची पावती पत्रकारांनी दिली होती. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची व्यवस्था आपल्या निवसाजवळच एकाच ठिकाणी करून ठेवली. आज या संस्थेत हजारो गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

५ वर्षापासून त्यांना अल्झायमरने ग्रासले होते. त्यातच नियमित तपासणी आणि उपचारासाठी त्यांना शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे आज पहाटे त्यांनी अखेरचं श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज पक्ष कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या रविवारी सायंकाळी आनंदवन परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.