देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? अनिल देशमुख यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे. या घटनेबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरणही दिले. मात्र, जनतेचा रोष कायम आहे. या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्याने संतापात भर पडली आहे. या घडामोडींवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अनिल देशमुख यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील…आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा सवाल अनिल देशमुख यांनी फडणवीसांना करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी 2009 साली अजय भोसले यांच्या हत्येचा सुपारी छोटा राजन टोळीला दिली होती. अजय भोसले 2009 साली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतून निवडणूकीला उभे असताना प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या अपघातामधून अजय भोसले बचावले. मात्र, त्यानंतर गुन्हा दाखल असुनही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती. आता पुणे अपघातानंतर या प्रकरणाचीही चर्चा होत आहे.

या अपघातानंतर जनतेत रोष निर्माण झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पुणे पोलिसांनी आपले सर्व काम व्यवस्थित पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.