गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गंगाखेड

गंगाखेड शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष तथा रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांना आज संभाजीनगर येथील सीआयडीच्या पथकाने अटक केली. शेतकऱयांच्या नावावर कोटय़वधींचे बोगस कर्ज उचलण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. कारखान्याचे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांची रवानगी कोठडीत केली आहे.

गुट्टे यांनी 22 बोगस कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून 26 हजार शेतकऱयांना व बँकांना कोटय़वधी रुपयांना चुना लावला. गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने 2015मध्ये हार्वेस्ट अँड ट्रान्सपोर्ट योजनेखाली  600पेक्षा जास्त शेतकऱयांच्या नावावर वाहन कर्ज उचलले. ही वाहने कारखान्यावर कामाला लावण्यात आली. शेतकऱयांकडून हप्त्याची वसुली करण्यात आली. मात्र कारखान्याने ही रक्कम बँकेत भरलीच नाही. त्यामुळे हे कर्ज दामदुप्पट व्याजासहित शेतकऱयांच्या बोकांडी बसले. वसुलीसाठी शेतकऱयांना नोटिसा जाताच हा सारा गोलमाल उघड झाला.

शारदा चिटफंडचा अहवाल गंभीर!

नवी दिल्ली – शारदा चिटफंड प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची सीबीआयने नुकतीच चौकशी केली. सीबीआयने सादर केलेला हा अहवाल अतिशय गंभीर असल्याचे निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. याची अधिक चौकशी करण्यासाठी दहा दिवसांत अर्ज करण्याचे आदेश सीबीआयला दिले. राजीवकुमार व इतरांनाही अर्ज करण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली. सीबीआयचा अहवाल सीलबंद असल्यामुळे दुसऱया पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देता येणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.