
हिंडेनबर्ग नावाच्या अमेरिकी कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या अहवालामुळे अदानी समूहाला जबरदस्त हादरे बसले आहेत. 25, 27 आणि 30 जानेवारी या शेअर बाजाराच्या तीन कामकाजी दिवसांत समूहाच्या समभागांची एकूण किंमत 29 टक्क्यांनी घसरली आहे. रकमेमध्ये सांगायचे झाल्यास अदानी समूहाला फक्त 3 दिवसांत 5.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अदानी समूहाने हिंडेनबर्गच्या अहवालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे मात्र तरीही त्यांच्या समभागांची घसरण सुरूच आहे. या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली असून, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानही हिरावले गेले आहे. जगातील 5 सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतूनही ते बाहेर फेकले गेले आहेत.
हे सगळं होत असताना अदानी समूहाला एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. अबुधाबीमधील शाही कुटुंबाशी निगडीत एका आंतरराष्ट्रीय कंपनीने अदानी समूहामच्या एफपीओमध्ये 3260 कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले आहे. अदानी समूहाने फॉलोऑन पब्लिक ऑफरद्वारे 4.55 कोटी समभाग शेअर बाजारात आणले आहेत. यातील अबुधाबीच्या कंपनीने 16 टक्के समभाग विकत घेतले आहेत. मात्र हिंदुस्थानातील सर्वसाधारण गुंतवणूकदारांकडून या एफपीओला थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 31 जानेवारीपर्यंत फक्त 3 टक्के समभाग या एफपीओद्वारे विकत घेण्यात आले होते.
अदानी समूहाकडून 413 पानांचे स्पष्टीकरण
हिंडेनबर्ग या अमेरिकन गुंतवणूक सल्लागार संस्थेने आपल्या अहवालाच्या माध्यमातून अदानी समूहावर केलेले आरोप म्हणजे हिंदुस्थानवर ठरवून केलेला हल्ला आहे. त्यांनी देशातील संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्तेवर प्रहार केला आहे. अमेरिकन कंपन्यांना फायदा पोहचवण्यासाठीच हे खोटे आरोप त्यांनी केले असल्याचा दावा अदानी समूहाने करून 413 पानांचे स्पष्टीकरण जाहीर केले आहे.
जगातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहाने ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला आहे. त्याचा मोठा झटका अदानी समूहाला बसला असून चार दिवसात तब्बल 4.2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाने आपले विस्तृत स्पष्टीकरण जारी केले आहे. त्यामध्ये हिंडेनबर्गचा अहवाल म्हणजे अमेरिकन पंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आणि बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी ठरवून केलेला हल्ला आहे. त्यांनी समूहावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत असेही म्हटले आहे.
हिंडेनबर्ग विश्वासार्हता नसलेली संस्था
हिंडेनबर्ग ही विश्वासार्हता आणि नैतिकता नसलेली संस्था आहे. त्यांच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झाला आहे. ‘हिंडेनबर्ग’चा अहवाल ‘स्वतंत्र’ संशोधनवर आधारित नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांनी बिनबुडाचे आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अदानीने स्पष्ट केले आहे.
फसवणुकीला राष्ट्रवादाचा मुलामा नको; हिंडेनबर्गचा पलटवार
हिंडेनबर्गने चुकीचे आरोप करून हिंदुस्थानवर हल्ला केला असल्याचा आरोप अदानी समूहाने केला आहे. त्यावर हिंडेनबर्गने जोरदार पलटवार करताना फसवणूकीला राष्ट्रवादाचा मुलामा नको असे म्हटले आहे. ‘अदानी समूहाच्या आरोपांशी आम्ही सहमत नाही. हिंदुस्थान एक लोकशाही आणि आगामी काळात महासत्ता होणारा देश आहे. पण, देशाची लूट करणाऱया अदानी समूहाने तिरंग्याखाली हिंदुस्थानचे भविष्य रोखले आहे. फसवणूक ही फसवणूकच असते. मग ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने केलेली असली तरी, असे हिंडेनबर्गने म्हटले आहे.
एलआयसी म्हणते,अदानी समूहात आमची एक टक्क्यापेक्षा कमी गुंतवणूक
अदानी समूहाचे शेअर गेल्या चार दिवसांपासून कोसळत असल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर एलआयसीने आपली बाजू मांडली आहे. आमची अदानी समूहात 36 हजार 474 कोटी रुपयांची गुंतवणूक असून ती आमच्या एकूण गुंतवणूकीपैकी एक टक्क्यापेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या काही वर्षात एलआयसीने अदानी समूहाच्या पंपन्यांमध्ये 30हजार 127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचे 27 जानेवारीचे बाजारमूल्य 56 हजार 142 कोटी रुपये होते, असे नमूद केले आहे.

























































