
हिंडेनबर्गने अदानी समूहाबद्दल प्रकाशित केलेल्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी, या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. संसदेबाहेरही आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यामुळे दुपारी दोननंतर दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे सभापतींनी तातडीने कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. पीठासीन अधिकारी किरीटभाई सोळंकी यांनी विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले खरे; मात्र विरोधक जेपीसीच्या मागणीवर ठाम होते. राष्टपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणे गरजेचे आहे. विरोधकांच्या सगळय़ा मागण्यांवर सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र, सभागृहाचे कामकाज चालू द्या, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असा विनवणीचा सूर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लावला. मात्र, विरोधकांनी त्याला दाद न देता, अदानी प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतही सुरुवातीला दुपारी दोनपर्यंत गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी जेपीसीची मागणी लावून धरली. यावेळी सभापती जगदीप धनखड हे काँगेस खासदार मुकुल वासनिक यांच्या घोषणाबाजीवर चांगलेच नाराज झाल्याचे दिसले. त्यांनी वासनिक यांना शांत राहण्याची सूचनाही केली. सभागृहाचे कामकाज चालत नाही हे दुर्दैवी आहे, असे सांगत सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
विरोधकांची रणनीती
संसदेच्या या आठवडय़ाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी काँगेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. जवळपास सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यात भाग घेतला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रतिनिधित्व या बैठकीत केले.
अदानीमागे कोणाची ताकद? राहुल गांधी यांचा सवाल
अदानी मुद्दय़ावर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अदानी प्रकरणावर संसदेत चर्चा होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. ते घाबरले आहेत. सरकारने चर्चा करावी. या चर्चेला संसदेत परवानगी दिली पाहिजे. अदानी यांच्यामागे कोणाची ताकद आहे हे देशाला कळायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले. सरकारबद्दल खूप दिवसांपासून म्हणत आलो आहे की, ‘हम दो हमारे दो’. आता मोदीजी अदानींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. हा मुद्दा मी 2-3 वर्षांपासून मांडतोय. दूध का दूध, पानी का पानी व्हावे. लाखो कोटींच्या भ्रष्टाचारावर चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
गांधी पुतळय़ाजवळ निदर्शने
संसदेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब झाल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ एकत्र होत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत, अदानीप्रकरणी जेपीसीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.




























































