
सामना ऑनलाईन। लंडन
दिवसेंदिवस महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पुरुषांच्या वाईट नजरांपासून मुलींचा बचाव करण्यासाठी इंग्लडमध्ये घरोघरी मुलींवर अघोरी उपचार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात वयात येणाऱ्या मुलींच्या छातीवर गरम दगडाने इस्त्री (‘ब्रेस्ट आयरन’) करण्यात येते. यामुळे मुलींच्या शरीराची वाढ खुंटते व त्या अनाकर्षक दिसतात. त्यामुळे पुरुष त्यांच्याकडे पाहात नाहीत. अशी येथील लोकांची धारणा आहे.
गार्डियनमध्ये याबद्दल लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील माहितीनुसार इंग्लडमध्ये कमीत कमी १ हजार अशा मुली आहेत ज्यांच्या छातीवर दगडाने इस्त्री करण्यात आली आहे. यातही लंडन, यॉर्कशायर, एस्सेक्स, वेस्ट मिडलँड्स मध्ये राहणाऱ्या कुटुंबात हा अघोरी प्रकार करण्यात येत आहे. याबद्दल सामाजिक संघटनांनी माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली आहे. घरातील महिलाच प्रामुख्याने आई, काकू आणि आजी मुली वयात येण्याआधीच त्यांना ‘ब्रेस्ट आयरन’ करते. यात दहा वर्षांच्या मुलींचाही समावेश असतो. अनेकवेळा ही ‘ब्रेस्ट आयरनिंग आठवड्यातून’ किंवा पंधरा दिवसातून एकदा करण्यात येते. असे केल्याने मुलींचा शारीरिक विकास खुंटतो व पुरुषांची वाईट नजर त्यांच्यावर पडत नाही, असे मुलींच्या आईंचे म्हणणे आहे.
पण यामुळे मुलींच्या शरीराबरोबरच त्यांच्या मनावरही वाईट परिणाम होतो. तसेच भविष्यात मुलींना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोकाही असतो. त्याचबरोबर मुलांना स्तनपान करणेही कठीण होते. जखम चिघळून त्यात संसर्ग होण्याचा धोकाही असतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
























































