Manohar Parrikar नाकामध्ये ट्यूब घालून सादर केला होता अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. पर्रिकर हे बऱ्याच काळापासून कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती. स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पर्रिकर यांच्यावर गोवा, मुंबई, दिल्ली आणि न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले, परंतु अखेर गोव्यातील निवासस्थानी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

Manohar Parrikar passed away पर्रिकर यांचा अल्प परिचय

पर्रिकर यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. गंभीर आजाराने त्रस्त असतानाही कामाप्रती त्यांचा प्रामाणिकपणा कमी झाला नव्हता. तब्येतीमध्ये चढ-उतार येत असतानाही पर्रिकर जातीने आपले काम करत होते, करवून घेत होते.

ड्रिप लावून कार्यालयात हजर
गंभीर आजारी असतानाही पर्रिकर हे ड्रिप घालून मुख्यमंत्री कार्यालयात येत होते. मंत्र्यांसोबत बैठका घेत होते. तसेच काम व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ते स्वत: साईटवर जात होते व कामाची माहिती घेत होते. पर्रिकर यांचा जोश, कामाचा अंदाज आणि प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगे होता.

नाकात ट्यूब घालून अर्थसंकल्प केला सादर
जानेवारीमध्ये गोव्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पर्रिकर नाकामध्ये ट्यूब घालून विधानसभेमध्ये आले होते. अर्थसंकल्प सदर केल्यानंतर ते म्हणाले होते की, आज मी पुन्हा एकदा तुम्हाला वचन देतो की शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पणाने गोव्याची सेवा करेल. शेवटच्या श्वासापर्यंत राज्य आणि देशसेवेसाठी झटून काम करणाऱ्या या नेत्याला आगामी काळात पिढी नक्कीच लक्षात ठेवेल.