गोव्याच्या सनबर्न फेस्टिव्हलला राज्य सरकारचा रेड सिग्नल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड नंतर पर्यटनासाठी खुल्या झालेल्या गोव्यात येऊन डिसेंबर मध्ये सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल एन्जॉय करायचा बेत आखला असाल तर तो आता तुम्हाला रद्द करावा लागेल. कारण गोवा सरकारने सनबर्नच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे.

युवा संगीत प्रेमींच्या पसंतीचा सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल डिसेंबर मध्ये उत्तर गोव्यातील वागातोर येथे 28 ते 30 डिसेंबर पर्यंत आयोजीत केला जाईल असे सांगण्यात येत होते. मात्र आता सनबर्न फेस्टीव्हलवर प्रमोद सावंत सरकारने रोख लावला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टीवलला रोख लावला असल्याची माहिती बुधवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकी नंतर दिली. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द केल्याने लाखो संगीत प्रेमींच्या आनंदावर विरजन पडले आहे तर राज्य सरकारला देखील मोठ्या प्रमाणात महसूलापासून वंचित रहावे लागणार आहे.

यंदाच्या महोत्सवात जागतिक किर्तीचे संगीतकार बुलझेये, ह्युमन, अर्जुन वागाले, डॉटडेट, त्याचबरोबर डीजे संजय दत्ता तसेच लोकोजेम यांचा समावेश होणार होता. कोविड नियमावलीचे पालन करीत मर्यादित संगीत प्रेमींच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले होते. मात्र आता हा फेस्टीव्हल होत नसल्याने लाखो सनबर्नप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.