खोदकामात सोने सापडल्याची अफवा; महिलेकडून फुटले बिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मागील तीन दिवसांपूर्वी एका घरात खोदकाम करून सोने पळवले असल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे खळबळ उडाली असून सध्या गावात या चर्चेला उधाण आले आहे. गावातील एका महिलेला खोदकामात निघालेल्या सोन्याचा वाटा न दिल्यामुळे ही घटना उघडकीस आल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

सदर घटनेबाबत पारध पोलिसांना माहित देण्यात आली असल्याने रविवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला आणि नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव मोठे आहे. या गावाची लोकसंख्याही जास्त आहे. गावतील लोकमान्य नगर रस्त्याजवळील धावडा येथील शेकडो लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणी शुक्रवारी, मध्यरात्री एका कुटुंबाने गुजरात येथील मांत्रिक बोलवून घरात तीन बाय सहाचा खड्डे खोंदून विधी आणि पूजा करून दोन कोंबड्यांचा बळी दिला. त्यानंतर त्याने त्या घरातील खोदकामात सापडलेले सोन पळवून नेल्याची अफवा गावात पसरली. याशिवाय शेजारी राहणाऱ्या एका महिलेला खोदकाम होत असल्याचा आणि बडबडण्याचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच तिने खिडकीतून पाहिले असता तिला हा सर्व प्रकार दिसला, मात्र तुलाही यातील सोने दिले जाईल, असे भितीपोटी आमिष त्या महिलेला दाखवण्यात आले. यामुळे ती महिला काहीच न बोलता शांत राहिली, मात्र तिला काहीच न दिल्यामुळे तिने याबाबत उलटसुलट चर्चा करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी खरा काय प्रकार घडला आहे, हे पाहण्यासाठी गावातील महिला आणि पुरुषांनी घटनास्थळी गर्दी केली. तेव्हा गावकऱ्यांना खोदकाम केलेला खड्डा दिसला. याबाबत पारध पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांनी घटनास्थळी भेट देत सदर खोदकाम झालेल्या ठिकाणी पुन्हा खोदकाम करून नेमके काय घडले आहे, ते पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी काहीच गवसले नाही. त्यामुळे नागरिकांनी शांत राहावे. अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक विलास घुसिंगे, प्रकाश सिनकर, सुरेश पडोळ आदी पोलीस कर्मचारी तपास करत आहेत. गुजरातहून आलेला मांत्रिक नेमके कशासाठी आला होता, याचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता हाती काहीच लागले नाही, मात्र पोलीस या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली.