
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाने देशभरात खळबळ माजवलेली असताना आता उत्तर प्रदेशमध्ये भाजप उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील गाडीने दोघांचा जीव घेतला आहे. करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर करण भूषण सिंह यांनी घटनास्थळावर त्या तरुणांना मदत न करता तेथून पळ काढला. करण भूषण सिंह हे भाजपचे माजी खासदार व देशातील कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले बृजभूषण सिंह यांचे पुत्र आहेत.
हा भीषण अपघात कर्नलगंज परिसरातील हुजूरुर-बहराइच रेल्वे क्रॉसिंगच्या येथे झाला. बुधवारी सकाळी, कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील भरधाव फॉर्च्युनरने दुचाकीला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोन्ही तरुण कित्येक मीटर अंतरावर पडले. दोन पादचाऱ्यांनाही या वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.
रेहान खान(17) आणि शहजाद खान(24) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर गंभीर जखमी झालेली महिला सीतादेवी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




























































