
सामना प्रतिनिधी, मुंबई
पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवसेनेच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम आता वेग घेणार आहे. या रस्त्याची प्रमुख कामे, विविध परवानग्या मिळवणे, मुख्य बोगद्यासाठी निविदा तयार करणे अशा कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर गोरेगाव ते मुलुंड हे अंतर फक्त 15 मिनिटांत पार करता येणार आहे.
मुंबईची वाहतूककोंडी फोडणे आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यामध्ये पालिकेचा महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गासाठी आधीच राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची परवानगी मिळाली आहे. आता राज्याच्या वन विभागाकडून परवानगी मिळवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मुख्य बोगद्याच्या कामाकरिता वन खाते, राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, पर्यावरण या परवानग्या मिळवणे, मुख्य बोगद्याच्या कामासाठी निविदा तयार करणे आदी कामांसाठी मे. पेन्टाकल कन्सल्टंटस प्रा.लि. या कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असा आहे प्रस्तावित लिंक रोड
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) 14 कि.मी. असणार आहे. या सहापदरी मार्गात 4.7 कि.मी. चे भुयारी मार्ग असेल. गोरेगाव ते मुलुंड हा सध्या तास-दीड तासाचा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार आहे. तीन वर्षांमध्ये या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रस्त्याच्या कामासाठी सल्लागारावर पालिकेला तीन कोटी नऊ लाखांचा खर्च येणार आहे.
























































