
सामना प्रतिनिधी । मुंबई
राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सळो की पळो करून सोडले आहे. मोदी सरकारवरवर शाब्दिक हल्ला चढवल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारला गांधी कुटुंबीयांच्या नावाची ऍलर्जी झाल्याचे दिसून येते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून देशात व राज्यात सुरू असलेल्या ‘राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर’ योजनेच्या नावातील राजीव गांधी यांचे नावच केंद्र सरकारने गायब करून आता ‘राष्ट्रीय पाळणाघर’ असे नामकरण करून टाकले आहे. या नव्या योजनेला 10 जानेवारीपासून सुरुवात झाली असून पाळणाघरांसाठी नवीन कडक नियमावली लागू झाली आहे. नव्या नियमावलीचा मात्र पाळणाघर चालकांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने ‘राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर’ योजनेचे नाव बदलून ‘राष्ट्रीय पाळणाघर’ योजना असे केले आहे. त्यामुळे राज्यात ‘राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सुमारे 1 हजार 670 पाळणाघरांची मान्यता रद्द केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश राज्याच्या महिला व बालविकास विभागाने प्रसिद्ध केला आहे. आता नवीन नावाने नवीन योजनेत पाळणाघरे सुरू करावी लागतील.
पालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतीकडे नोंदणी
राज्यात पाळणाघर चालवणाऱया स्वयंसेवी संस्थांच्या चालकांनी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद क्षेत्रातील संस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर नगर पंचायत क्षेत्रासाठी मुख्य अधिकाऱयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावाला संबंधित महापालिका, जिल्हा परिषद व नगर पंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीची परवानगी आवश्यक आहे.
नवीन नियमावली जारी
राज्यात पाळणाघर चालवण्यासाठी नवीन नियमावली जारी झाली आहे. त्यात पाळणाघरात किती बालके असावीत, बालकांमागे किती कर्मचारी असावेत, पाळणाघरांची वेळ, पाणी, स्वच्छता, झोपण्याची व्यवस्था, बालकांना खेळण्यासाठी-रांगण्यासाठी मोकळी किती जागा असावी, हवा, वायुविजन, उजेड, प्रथमोपचार, औषधे कशी असावीत, कर्मचाऱयांचे शिक्षण याचे निकष जारी केले आहेत.
- बालकांची मर्यादा
प्रत्येक पाळणाघरात 25 पेक्षा अधिक बालके नकोत. सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची दहा बाळे आणि तीन ते सहा वर्षांपर्यंतची 15 बालकेच असावी. - प्रत्येक बाळासाठी जागेची अट
प्रत्येक बाळासाठी किमान 6 ते 8 चौरस फूट जागा आवश्यक आहे. बाळाला मोकळेपणाने खेळण्यासाठी जागा आवश्यक. पाळणाघरासाठी कमाल 150 ते 200 चौरस फूट जागा आवश्यक. - कर्मचारी शिक्षण व संख्या
दहा बाळांच्या मागे एक कर्मचारी व एक मदतनीस आवश्यक. कर्मचाऱयाचे किमान शिक्षण बारावी तर मदतनीसाचे किमान शिक्षण दहावी आवश्यक. - साडेसात तासांचे बंधन
पाळणाघर साडेसात तास सुरू असावीत. त्यासाठी पाळणाघरांची वेळ सकाळी 7 ते दु. 2.30, सकाळी 8 ते दु. 3. 30 व सकाळी 9.30 ते 4.30 अशी वेळ निश्चित केली आहे. यापेक्षा अधिक वेळेसाठी बालकाला ठेवायचे असेल तर परवडतील असे दर परस्पर सामंजस्याने आकारण्यात येतील. महिन्यातून 26 दिवसच पाळणाघरे सुरू ठेवावीत. - मुख्य सचिवांकडून आढावा
राज्यात चालवण्यात येणाऱया सर्व पाळणाघरांचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून घेण्यात यावा असेही शासन आदेशात नमूद केले आहे.



























































