फिफातील त्रिमूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

रशियात सध्या फुटबॉलचा मेगा शो सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात भव्यदिव्य आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा आपल्या देशाने जिंकावी यासाठी सहभागी देशांतील प्रत्येक फुटबॉलपटू अतोनात प्रयत्न करतो, पण प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. या स्पर्धेचा पहिला टप्पा संपला असताना जर्मनी वगळता एकाही मोठ्या संघाला पराभवाचा ४४० व्होल्टचा झटका बसला नाही. मात्र प्राथमिक फेरीच्या लढतींमध्ये काही संघांनी फुटबॉलच्या रणांगणात पॉवरफुल कामगिरी करीत चॅम्पियन बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यावेळी तीन खेळाडूंनी आपल्या संघाला बाद फेरीत पोहचण्यासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन, क्रोएशियाचा स्टार खेळाडू लुका मॉड्रिच व बेल्जिमयचा स्ट्रायकर रोमेलू लुकाकू या खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप…

१९६६ नंतर…

वेस्ट हॅम युनायटेडकडून खेळणाऱया बॉबी मूरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने १९६६ साली वर्ल्ड कप जिंकला होता. ते त्यांचे पहिले आणि आतापर्यंतचे शेवटचे जेतेपद ठरलेय. यादरम्यान ५२ वर्षे उलटून गेलीत. आता हॅरी केनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा युवा संघ छोटी छोटी पावले उचलत पुढे रूढ होतोय. योगायोगाची बाब म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्याची करामत केली तेव्हा बॉबी मूर २५ वर्षांचा होता आणि आता हॅरी केनचे वय आहे २४ वर्षे. हॅरी केनने इंग्लंडच्या १७, १९, २०, २१ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले असून २०१७ साली स्कॉटलंडविरुद्धच्या वर्ल्डकप पात्रता फेरीच्या लढतीत त्याच्या खांद्यावर इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत त्याने निर्णायक क्षणी गोल करीत इंग्लंडला बरोबरी साधून दिली. तसेच जादा वेळेत गोल करीत इंग्लंडला स्लोवेनियावर विजय मिळवून देत रशियाचे तिकीटही बुक करून दिले. आता वर्ल्ड कपमध्ये त्याने पनामाविरुद्धच्या लढतीत केलेल्या हॅटट्रिकसह पाच गोल करीत इंग्लंडला बाद फेरीत पोहचविले. याआधी जेफ हर्स्ट व गॅरी लिनेकर यांनाच इंग्लंडसाठी वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक करता आली.

मॅराडोनानंतर दुसराच

ऍण्टवर्प येथे जन्मलेला रोमेलू लुकाकू हा गरीब कुटुंबात वाढला. २५ वर्षीय या खेळाडूच्या खांद्यावरच बेल्जियमची मदार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अर्थात त्यांचा संपूर्ण संघ रशियातील वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळतोय. त्यांच्या दुय्यम संघानेही साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत इंग्लंडच्या दुय्यम संघाला हरवले हा भाग वेगळा. बेल्जियमची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी १९८६ साली झालीय. त्यावेळी त्यांनी चौथे स्थान पटकावले होते. आता रोबर्टो मार्टिनेज यांच्या मार्गदर्शनाखाली बेल्जियमने साखळी फेरीत घवघवीत यश संपादन केले आहे. रोमेलू लुकाकूने पनामा व टय़ुनिशिया या दोन्ही लढतींमध्ये प्रत्येकी दोन गोल केले. वर्ल्ड कपमधील सलग दोन लढतींत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोल करणारा रोमेलू लुकाकू हा दिएगो मॅराडोना (१९८६) नंतरचा दुसराच खेळाडू ठरलाय.

२५ यार्डवरून अफलातून किक

क्रोएशिया हा १९३० ते १९९०पर्यंत युगोस्लावियाचा भाग होता. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये त्यांचा स्वतंत्र सहभाग झाला तो १९९८ साली. फ्रान्समध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी थेट सेमी फायनलपर्यंत धडक मारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या डेव्ह सुकरने त्या स्पर्धेत गोल्डन बुटचा पुरस्कारही मिळवला होता. क्रोएशियाची ती गोल्डन जनरेशन होती. त्यानंतर मात्र या संघाला वर्ल्ड कप किंवा युरो स्पर्धेत मोठी झेप घेता आलेली नाही. मात्र रशिया येथे झ्लॅटको डॅलीच यांच्या मार्गदर्शनाखाली क्रोएशियाच्या संघाने पहिल्याच फेरीत तीन सामने जिंकून धमाका केलाय. या वर्ल्ड कपमध्ये या संघाची मिडफिल्ड काबिल ए तारीफ कामगिरी करतेय. इवान पेरीसीच, ऍण्टे रेबीच आणि लुका मॉड्रिचचे अफलातून कॉम्बिनेशन प्रतिस्पर्ध्यांना नाकीनऊ आणतेय. ३२ वर्षीय अनुभवी खेळाडू लुका मॉड्रिचने तीन सामन्यांमध्ये दोन गोल केले असून यापैकी अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत २५ यार्डावरून (२३ मीटर) केलेला गोल भन्नाटच होता. ‘प्ले मेकर’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू क्रोएशियाला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी बाद फेरीतही सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही.

वर्ल्ड कपमध्ये

  • हॅरी केन

सामने                   –       २
गोल                     –       ५
मैदानावरील मिनिटे     –       १५३
स्पॉट किकवर गोल     –       २
हेडरवर गोल            –       १
उजव्या पायाने गोल     –       ३
पासेस                    –      २३

  • रोमेलू लुकाकू 

सामने                   –      २
गोल                     –      ४
मैदानावरील मिनिटे     –    १४९
टार्गेटवर निशाणा        –     ४ वेळा
डाव्या पायाने गोल      –      २
उजव्या पायाने गोल     –       १
पासेस                   –     २२

  • लुका मॉड्रिच

सामने                      –      ३
गोल                        –      २
मैदानावरील मिनिटे        –      २४५
स्पॉट किकवर गोल        –      १
उजव्या पायाने गोल        –     २
टार्गेटवर निशाणा           –     २ वेळा
पासेस                       –     १४३