दिल्ली डायरी – ‘आप’, गुजरात आणि ‘आपबिती’!

>> नीलेश कुलकर्णी n [email protected]

गुजरात निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे दिल्लीकरांनी टाकलेल्या ‘फाशा’त आम आदमी पक्ष कळत-नकळत अडकत आहे. ‘आप’ला सतत चर्चेत ठेवून बदनाम करण्याची मोहीम आखली गेली आहे. जेणेकरून काँगेस पक्ष राजकीय पटलावरून अदृश्य व्हावा. दुर्दैवाने ‘आप’ने भाजपच्या या रणनीतीला अप्रत्यक्षपणे बळच दिले आहे. ‘आप’च्या नेत्यांनी केलेल्या ‘करामतीं’मुळे त्या पक्षावर ‘आपबिती’ ओढवली आहे.

आम आदमी पक्षाचे ग्रह फिरले की फिरवले गेले, हे समजायला मार्ग नाही. मात्र एकापाठोपाठ एक अशा घटनांनी आपचाही ‘चाल, चरित्र आणि चेहरा’ उघड केला आहे. सत्येंद्र जैन यांच्या मसाजचे प्रकरण ताजे असतानाच, ताहिर हुसैन नावाच्या आपच्या एका नेत्याला दिल्लीतील दंगलीप्रकरणी जामीन फेटाळण्यात आला, तर सौरभ भारद्वाज या आपच्या अन्य नेत्याने आत्महत्या केली. दुसरीकडे दिल्लीतील जनतेने आपच्या एका आमदाराला पळवून पळवून मारले. या अशा घटनांनी आम आदमी पक्षाच्या लौकीकावर प्रश्नचिन्ह लागत आहे.

हिमाचल आणि गुजरातमधील निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या श्रेष्ठाRनी एक वेगळी राजकीय चाल खेळली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला नाही म्हटले तरी बऱयापैकी प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेससारख्या कश्मीर ते कन्याकुमारी असा बेस असलेल्या पक्षाला राजकीय पटलावरून ‘अप्रासंगिक’ करण्यासाठी भाजपनेच आम आदमी पार्टीचा ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडिया व मीडियाद्वारे हिमाचल व गुजरातमध्ये केजरीवाल ‘चमत्कार’ घडवतील, अशी आवई उठविण्यात आली. अर्थात ज्याचे थोडेफार राजकीय आकलन आहे, अशी कोणतीही व्यक्ती या दोन्ही राज्यांत ‘आप’चे काही होणार नाही, हे छातीठोकपणे सांगू शकेल. त्यासाठी कुठल्या राजकीय कुडमुडय़ा ज्योतिषाचीही गरज नाही. मात्र ‘आप’ सतत चर्चेत कसा राहील याची तजवीज दिल्लीतून केली गेली आहे. पुन्हा प्रसिद्धीने केजरीवाल हुरळून जातात हे काही नवे नाही. दिल्ली आणि पंजाबसारख्या दोन राज्यांतील बेस सोडला तर आपचे केडर अजून देशभरात पसरलेले नाही. तरीही या महाशयांना 2024 मध्येच पंतप्रधान होण्याची दिवास्वप्ने पडत आहेत आणि त्याला भाजपकडून पद्धतशीरपणे खतपाणी घातले जात आहे. काँगेसची ‘पॉलिटिकल स्पेस’ सध्या तरी ‘आप’ भरून काढू शकणार नाही. मात्र मीडियातली काँग्रेसची ‘स्पेस’ ‘आप’ने भरून काढली हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिल्लीकरांनी दिला असला तरी काँग्रेसबाबत अजूनही भाजपच्या मनात धाकधूक आहे. त्यामुळेच अशा तिरपागडी चाली दिल्लीतून खेळाव्या लागत आहेत.

माकन यांना ‘नारळ’

राजस्थानमधून अशोक गेहलोत यांची उचलबांगडी करायचीच, असा विडाच उचलून काम करणाऱया अजय माकन यांना राजस्थानच्या जबाबदारीतून मुक्त करत काँगेस पक्षाने एक शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, काँगेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून राजस्थानातील काँगेसचा सत्तासंघर्ष शिगेला पोहचला होता. काँगेस अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गेम केला जातोय, हे चाणाक्ष गेहलोतांना लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानंतर गेहलोतांनी काँगेसचे राजकारण जादुई पद्धतीने फिरवले आणि काँगेस अध्यक्षपदाची माळ अचानकपणे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना कर्नाटकाच्या मल्लिकार्जुन खरगेंच्या गळ्यात पडली. भाजपचा मांडववारा खाऊन आलेल्या आणि पक्षाप्रति एकनिष्ठ नसलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू नका, असा बहुतांश आमदारांचा सूर असताना राजस्थान प्रभारी असलेल्या अजय माकन यांनी पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले. ते सपशेल अपयशी ठरल्यानंतर खरगे अध्यक्ष झाल्यानंतर माकन पुन्हा जयपूरमध्ये पोहोचले. भंवर जितेंदर यांनी खरगेंना माकन यांच्या कारनाम्याची माहिती दिल्यानंतर, खरगेंनी कडक भूमिका घेत ‘जयपूर छोड के फटाफट दिल्ली वापस आओ’ असे फर्मान माकन यांना सोडले. मात्र माकन यांनी ते जुमानले नाही. उलट पक्षाविरोधात हालचाली करणाऱया तीन आमदारांवर कारवाईची मागणी केली. या तीनपैकी एका आमदाराची राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर माकन यांना आपला ‘गेम’ झाल्याचे लक्षात आहे. आता गेहलोतांनाही हायसे वाटले असेल. जादूगार गेहलोत पुढे कुठली राजकीय जादू करतात बघू.

शिवपाल चाचांची कोंडी
मुलायमसिंग यादवांच्या निधनानंतर मैनपुरीमध्ये होणाऱया लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात अगोदरच फूट पडलेल्या यादव परिवारात यानिमित्ताने आणखी फूट पाडण्याचे भाजपचे, विशेषकरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे कारनामेदेखील उघडे पडले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्न अखिलेश यांच्यापुढे होता. त्यांनी पत्नी डिंपल यांना आग्रह केला. मात्र लोकसभेला सलग दोन पराभव पचवावे लागल्याने डिंपल या निवडणुकीसाठी फारशा उत्सुक नव्हत्या. मग अखिलेश यांनी तेजप्रताप यादवांना उमेदवारी द्यायचे ठरवून घराणेशाही जोपासण्याचा खटाटोप सुरू केला. मैनपुरीमध्ये मुलायम यांच्या जागी त्यांच्या मूळ घराण्यातले कोणी उभे राहत नाही हे लक्षात येताच योगींनी नाराज शिवपाल यांना पह्न फिरवला. ‘लखनौ आईये मिलने के लिए’ हा योगींचा मेसेज येताच दिल्लीत असलेले शिवपाल तातडीने लखनौकडे रवाना झाला. शिवपाल आणि योगींची बैठक होणार, याची भनक लागताच मैनपुरीची जागा गमवावी लागेल, हा धोका ओळखून अखिलेश यांनी डिंपल यांना हे गांभीर्य लक्षात आणून देऊन निवडणुकीसाठी राजी केले. तिकडे शिवपाल चाचा लखनौमध्ये दाखल होण्यापूर्वीच ‘डिंपल यादव मैनपुरी से चुनाव लडेगी,’ ही ब्रेकिंग न्यूज झळकल्याने योगी-शिवपाल भेट फक्त चहापुरतीच मर्यादित ठरली. ‘योगीजी, हमारे बीच मतभेद जरूर है. लेकिन नेताजी जाने के बाद मै मेरे बहू के सामने चुनाव नही लड सकता,’ असे सांगत शिवपाल चाचांनी शस्त्र्ाs टाकली.