
सामना ऑनलाईन । प्रॉव्हिडेन्स (गयाना)
हिंदुस्थानी महिला संघाची कर्णधार हरमनप्रितने ती क्रिकेटपटू म्हणून जेवढी महान आहे तेवढीच माणूस म्हणूनही मोठी असल्याचा प्रत्यय विंडीजमध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आणून दिलाय.
— Mushfiqur Fan (@NaaginDance) November 11, 2018
त्याचे झाले असे की, स्पर्धेतील हिंदुस्थान- पाकिस्तान लढतीआधी राष्ट्रगीत सुरू असताना खेळाडूंना मैदानात आणणाऱया एका छोटय़ा मुलीला भोवळ आली. राष्ट्रगीत संपताच हरमन त्या मुलीकडे धावली. तिने त्या चिमुकलीला कुशीत घेत उचलले आणि उपचारासाठी डॉक्टरांकडे सोपवले. हिंदुस्थानी कर्णधार हरमनच्या या माणुसकीच्या दर्शनाने संयोजकांसह उपस्थित प्रेक्षकही भारावले. त्यांनी हरमनच्या माणुसकीला सलाम करण्यासाठी स्टेडियममध्ये उभे राहून तिला मानवंदना दिली.
हिंदुस्थानी संघाने आयसीसी महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप दुसऱया सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 7 विकेट राखून पूर्ण केले. हिंदुस्थानकडून मिताली राजने 47 चेंडूंत 56 धावांची शानदार खेळी केली. तर स्मृती मनधानाने 28 चेंडूंत 26 धावा केल्या. पण या सामन्याच्या सुरुवातीला घडलेल्या एका घटनेने सर्वांची मने जिंकली ती हिंदुस्थानी कर्णधार हरमनप्रीत कौरने. हरमनच्या माणुसकीने भरलेल्या कृतीचा व्हिडीओ सोशल साइटस्वर व्हायरल झाला आणि हिंदुस्थानी क्रीडा शौकिनांची मान या ‘हिंदुस्थान की बेटी’च्या वागणुकीने अभिमानाने उंच झाली. हरमनच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुक देशविदेशातील क्रिकेटशौकीन तिला अभिनंदनाचे मेसेज पाठवून करीत आहेत.

























































