
सामना प्रतिनिधी, कल्याण
‘हायअलर्ट’च्या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात चार दिवसांपूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला. कमांडो, श्वानपथकाने स्थानक परिसराचा कोपरा न् कोपरा पिंजून काढला. स्कायवॉकवरील भिकारी, वारांगना, फेरीवाल्यांना पिटाळून लावले. मात्र हायअलर्टचा इशारा एक दिवसाचाच ठरला. आता स्थानकातील सुरक्षा ढिली झाली असून पुन्हा रेल्वे स्कायवॉकचा ताबा फेरीवाल्यांनी घेतला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणांनी देशातील प्रमुख विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर संभाव्य दहशतवादी हल्याचा धोका असल्याचा ‘हायअलर्ट’ घोषित केला आहे. यामध्ये कल्याण रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. रविवारपर्यंत संशयास्पद प्रवासी आणि त्यांच्याकडील साहित्यांची कसून तपासणी करण्यात आली. स्थानकावर सुरक्षा तपासणी सुरू होताच हप्ते घेणाऱ्या ‘पंटर’नी फेरीवाल्यांना पिटाळून लावले. आज मात्र स्थानकातील सुरक्षा ढिली झाली. याचा फायदा पुन्हा फेरीवाल्यांनी घेतला आणि स्कायवॉकवर कब्जा केला. सुरक्षा ढिली झाल्यामुळे स्थानक आणि प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
‘रेड लाइट एरिया’ व्हिडीओने स्टेशन बदनाम
‘कल्याण स्टेशन रेड लाइट एरिया’ या व्हिडीओने महिनाभरापूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये स्कायवॉकवरच वारांगना आणि ग्राहक यांचा सौदा कसा चालतो हे दाखवले होते. या किळसवाण्या प्रकारामुळे महिला आणि मुली या स्कायवॉकचा वापर कसा टाळतात याचे विदारक चित्रणही यामध्ये होते. यामुळे कल्याण स्टेशन बदनाम झाले. व्हिडीयो व्हायरल झाल्यावर पोलिसांनी येथे सुरक्षा वाढवली. मात्र काही दिवस फेरीवाले आणि वारांगना यांनी येथून काढता पाय घेतल्यानंतर आता पुन्हा येथे ठाण मांडले आहे.




























































