मुंबईत आज, उद्या मुसळधार; कोकण, उत्तर-पश्चिम महाराष्ट्राला रेड ऍलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज दिवसभर पावसाचा जोर कमी असल्याने रिपरिप सुरू होती. मात्र, मुंबईला पुढील 48 तासांसाठी ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार बरसणार आहे तर कोकण, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवसांसाठी रेड ऍलर्ट देण्यात आला असून तिथे अतिवृष्टी होईल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

जून महिन्यात गायब झालेल्या पावसाने जुलैमध्ये राज्यात दमदार हजेरी लावली असून राज्यात सर्वदूर पसरला आहे. राज्यात पर्वतरांगा असलेल्या भागांत चांगला पाऊस पडत असून राज्यातल्या काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील पालघरमध्ये पुढील तीन दिवस, रायगडमध्ये दोन दिवस तर रत्नागिरीत उद्या अतिवृष्टी होणार असून मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार कोसळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही मंगळवार ते गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडय़ातील संभाजीनगर, जालना, नांदेड तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर गडचिरोलीत मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यात इतर भागात आठवडाभर ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

मुंबईत वाऱ्याचा वेगही वाढणार 

मुंबईला मंगळवार आणि बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून वाऱयाचा वेगही ताशी 40 ते 50 किलोमीटर राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

दोन घरांची पडझड 

मुंबईत आज पावसाचा जोर कमी असला तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरात मिळून दोन घरांची पडझड झाली. मुंबईत 9 ठिकाणी झाडे आणि झाडाच्या फांद्या पडल्या, मात्र यात कोणीही जखमी झाले नाही. पावसाचा जोर कमी असल्यामुळे मुंबईतील वाहतूक सुरळीत होती. मुंबईत आज 10 तासांत 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.