श्रावणसरींची जोरधार! मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची उडाली तारांबळ

फोटो - रुपेश जाधव

जुलैमध्ये धो-धो कोसळून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी मुंबई शहर व उपनगरांत दमदार हजेरी लावली. भरदुपारी संध्याकाळसारखा काळोख पसरला होता, तर सायंकाळी पाचनंतर श्रावणसरींनी धो-धो बरसात करीत कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडवली. मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. श्रावणसरींच्या ‘जोर’धार एण्ट्रीने वातावरणात गारवा परतला आहे.

हवामान खात्याने शुक्रवारीच मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरवत पावसाने मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पुनरागमन केले. शहरात सकाळपासून पाऊस सरीने पडत होता. दुपारनंतर पावसाचा मूड बदलला आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण करीत मुसळधार हजेरी लावली. जवळपास तासभर धो-धो बरसात सुरू ठेवत मुंबईकरांना झोडपले. या पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. लोकल गाडय़ा वेळेवर धावत होत्या. मात्र पावसाचा जोर वाढण्याच्या शक्यतेने एकाचवेळी मोठय़ा प्रमाणावर चाकरमान्यांनी घर गाठण्यासाठी धावाधाव केली. त्यामुळे रेल्वे स्थानकांत गर्दीचे चित्र होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबई व परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

कोकणाला झोडपले; अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपासून कोकणालाही झोडपून काढले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात दमदार पाऊस कोसळला. या पावसात राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्याने या घाटरस्त्यातील वाहतूक टप्प झाली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्यासह मोठमोठे दगड खाली आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे कोकणात जाणारे मुंबईतील चाकरमानी पुणेमार्गे अणुस्कुरा घाटातून प्रवास करतात. हा घाटरस्ता बंद झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यामध्ये पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली आहे. याचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरले आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिह्यांना ‘रेड अलर्ट’, तर काही जिह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, जळगाव या जिह्यांत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.