बडतर्फ 371 कामगारांना पूर्ववत कामावर घ्या, स्पाइस जेटला हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 371 कामगारांना अचानक कामावरून बडतर्फ करणाऱ्या स्पाइस जेट विमान कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. बडतर्फ केलेल्या कामगारांना 30 जूनपूर्वी पूर्ववत कामावर घ्या, अन्यथा औद्योगिक न्यायालयातील निकाल लागेपर्यंत बडतर्फ कामगारांचे 1 जानेवारी 2022 पासून पुढील काळातील वेतन व अन्य लाभांइतक्या रकमेची बँक हमी द्या, असे आदेश न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ कामगारांना दिलासा मिळाला आहे.

स्पाइस जेट कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्यांचा वाद औद्योगिक न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही या विमान पंपनीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हँडलिंगचे काम करणाऱ्या 371 कामगारांना 1 जानेवारी 2022 पासून कामावरून काढले. तसेच त्या ठिकाणी कंत्राटी कामगारांची भरती केली. कंपनीची ही कृती बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवत औद्योगिक न्यायालयाने बडतर्फ कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आदेश स्पाइस जेटला दिले होते. त्या आदेशाला पंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर दीर्घ सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती जमादार यांनी बडतर्फ कामगारांना दिलासा दिला.

ज्या 60 कामगारांना यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2022 पासून पगार मिळत आहे, तो यापुढेही सुरू ठेवा तसेच उर्वरित 311 कामगारांना 30 जूनपूर्वी पूर्ववत कामावर घ्या, अन्यथा औद्योगिक न्यायालयातील निकाल लागेपर्यंत 1 जानेवारी 2022 पासून पुढील काळातील वेतन व अन्य लाभांइतक्या रकमेची बँक हमी द्या, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱया स्पाइस जेट पंपनीला मोठी चपराक बसली असून बडतर्फ कामगारांना दिलासा मिळाला आहे.