घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक, 28 तोळे सोने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विविध भागांत घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केले. त्यांच्याकडून 12 लाख 60 हजार रुपये किमतीचे 28 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. जयवंत गोवर्धन गायकवाड उर्फ जाड्या 32, रा. आंबेडकर वस्ती, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

घरफोडी तपासाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट पाचचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कारागृहातून सुटलेला आरोपी जयवंत गायकवाड याने मोठी घरफोडी केली असून तो सोलापूरला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती हवालदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 28 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, दीपक लांडगे, रमेश साबळे, दयाराम शेगर, संजय दळवी, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.