शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घर जळून खाक, भडकलेल्या आगीत सिलिंडरचाही स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथील झुजे संतान फर्नांडिस यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत त्यांचे घर जळून खाक झाले. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीच्या धुराचे लोट समुद्रकिनाऱ्यावरून दूरपर्यंत दिसत होते.

दरम्यान, भडकलेल्या आगीत घरातील सिलेंडर स्फोट झाला. भिंतींना तडे गेले. घरातील सर्व साहित्यही जळल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. नातेवाईक असलेली एक महिला आठ दिवसांपासून झुजे यांच्या घरी आली होती. ती व तिचे 10 दिवसांचे बाळही या घटनेतून सुखरूप बचावले आहे.

सुक्या मासळीचा व्यवसाय असणारे झुजे संतान फर्नांडिस हे पत्नी गिलेरिन व मुलगा संतान यांच्या सोबत देवबाग डिंगेवाडी येथे राहतात. रविवारी सकाळी घरातून धूर यायला लागला. त्यामुळे घरातील माणसे बाहेर आली. काही क्षणात आग भडकली. वाऱ्याच्या वेगात आग वाढत होती. यात फर्नांडिस यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील मंडळींनी तसेच स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कुडाळ अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले.

पोलीस पाटील, पोलीस, तलाठी, वीज वितरण कर्मचारी आदी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. आगीत फर्नांडिस कुटुंबियांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कपाटात ठेवलेली रोख रक्कम तसेच काही दागिने, मंगळसूत्र जळून गेल्याचे बोलले जात होते.

सुके मासे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अर्थात हातावर पोट असणाऱ्या फर्नांडिस कुटुंबाचे घर पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान तात्पुरती मदत म्हणून देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने 15 हजार तर शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर यांनीही 10 हजार मदत केली आहे.