
>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट ([email protected])
प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार फाउंडेशनची निवड करावी लागते. त्वचेचे तीन प्रकार आहेत – 1) ड्राय स्किन 2) ऑयली स्किन 3)कॉम्बिनेशन स्किन. स्किनच्या प्रकारानुसार जर फाउंडेशनची निवड केली तर आपला मेकअप परफेक्ट होऊ शकतो. तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील, काही पिगमेंटेशन असतील तर ते फाउंडेशनने कव्हर होऊ शकतात आणि तुमची स्किन एकदम फ्लोलेस, नॅचरल, नितळ दिसेल.
लाईट मेकअप, हेवी मेकअप यांसाठी फाउंडेशन लावणे जरुरी आहे. ऑईल बेस फाउंडेशन, वॉटर बेस फाउंडेशन, सिलिकॉन बेस फाउंडेशन, यातही एचडी फाउंडेशन, क्रीम फाउंडेशन, स्टिक फाऊंडेशन, पावडर बेस फाउंडेशन असे फाउंडेशनचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या सगळय़ा फाउंडेशनमधून आपण आपल्या स्किनला योग्य अशा फाउंडेशनची निवड करावी लागते. त्यासाठी अनेक वेळा हाताच्या मनगटावर फाउंडेशन लावून ते निट पसरवून आपल्या स्किनला मॅच होते की, नाही हे पाहण्याची पद्धत आहे, पण हेच आपण आपल्या हनुवटीच्या वर आणि थोडे मानेपर्यंत वन स्ट्रोकनी जर चेहऱ्यावर फाउंडेशन लावले तर आपल्याला आपल्या स्किनला हे फाउंडेशन मॅच होते की, नाही ते अगदी बरोबर कळते.
फाउंडेशनच्या बाटलीवर नॉर्मल टू ड्राय आहे की, ऑइल बेस फाउंडेशन आहे हे लिहिलेले असते. ऑइल बेस फाउंडेशन हे थिक असतात, हे ड्राय स्किनसाठी अगदी योग्य म्हणता येईल कारण यात ऑइल आणि मॉश्चरायझर्स मिक्स असते. फाउंडेशन घेताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे यात एसपीएफ किती आहे हेही पाहावे. ड्राय स्किनसाठी तुम्ही क्रीम बेस फाउंडेशन ही वापरू शकता, मात्र जास्त ड्राय स्किनसाठी लिक्विड फाउंडेशन वापरावे. स्टिक फाउंडेशन ही कॉम्बिनेशन व ऑईली स्किनसाठी चांगली असते. फक्त चेहऱ्यावर जास्त मुरुमे असल्यास तुम्ही वॉटर बेस्ट फाउंडेशन वापरा. ओईली स्किनसाठी ऑइल बेस फाउंडेशन चुकीचे ठरू शकते. ऑइल फ्री, मॅटी फाय फाउंडेशन, वॉटर बेस्ट फाउंडेशन ऑईली स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे. फाउंडेशन घेताना स्वतःचा टोन माहीत असणे गरजेचे आहे.
कसा वापर कराल
फाउंडेशन लावताना नेहमी क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करून योग्य प्रायमर लावा आणि या प्रायमरवर फाउंडेशनचा वापर करा. प्रायमरआधी जर तुम्हाला डार्क सर्कल असतील तर मात्र कन्सीलर लावण्याची गरज आहे आणि जर डार्क सर्कल नसतील तर डायरेक्ट फाउंडेशन लावा.
अलीकडे एचडी फाउंडेशन किंवा लाँग लास्टिंग सुपर स्टे फाउंडेशन, फुल कव्हरेज फाउंडेशन, मुस, अशा प्रकारचे फाउंडेशन उपलब्ध आहेत आणि ते तुम्ही जर लावून पार्टीला गेलात तर छान लुकही देतात आणि बराच वेळ टिकतातही. तसेच चेहऱ्यावरचे डाग,काही पिंपल्सचे मार्क्स लपले जातात.
अनेक वेळा तुम्ही सीसी किंवा बीबी क्रीमदेखील फाउंडेशन म्हणून वापरता, तर तुम्ही स्वतःचं फाउंडेशन कस्टमाइजदेखील करू शकता आणि ते करण्यासाठी सीसी क्रीममध्ये तुमच्या टोन्सचे फाउंडेशन मिक्स करता येईल. किंवा सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझरमध्ये थोडंसं फाउंडेशन मिक्स करता येईल.
लक्षात ठेवा जर तुमचे वय 40 च्या पुढे असेल तर तुम्ही मॅट ड्राय फाउंडेशनची निवड मुख्यत्वे करू नका. कारण या टाईपच्या फाउंडेशनमुळे जास्त वयस्कर भासाल. स्वतःच्या स्किन टोनपेक्षा जास्त फेअर फाउंडेशन खरेदी करू नका, नाहीतर तुमचा चेहरा वेगळा आणि तुमच्या इतर अवयवांचा रंग वेगळा दिसेल.






























































