पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना ‘जीवनगौरव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम ‘जीवनगौरव’ तर ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर ‘जीवनगौरव’ पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सलीम खान यांच्या वतीने त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

“ज्यांच्या नावाचा आज मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला, ते महान चित्रतपस्वी व्ही. शांताराम आणि माझे संबंध फार जिव्हाळ्याचे होते. त्यांना मी ‘आण्णा’ म्हणायचो. त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्यांच्या ‘चानी’ या वास्तववादी चित्रपटाला मी संगीत दिले होते. संगीत, साहित्य, सामाजिक बांधिलकी यात मी जे काही काम केले, त्याची दखल घेऊन मला या पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल मी राज्य शासनाचा आभारी आहे. माझे वडील, माझ्या बहिणी, गुरुजन आणि रसिकांच्या आशीर्वादामुळेच हे साध्य होत आहे.” — हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ संगीतकार