जिजामाता उद्यानात हम्बोल्ट पेंग्विनने दिलं पहिलं अंडं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जिजामाता उद्यानातल्या पेंग्विनच्या जोडय़ांपैकी मोल्ट आणि फ्लिपर यांनी मुंबईकरांना गोड बातमी दिली आहे. या जोडीतील मादी फ्लिपर हिने गुरुवारी आपल्या घरटय़ात एक अंडे दिले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लवकरच नवीन पाहुणा जिजामाता उद्यानात जन्म घेणार आहे. जिजामाता उद्यानातील कर्मचाऱ्यांनी फ्लिपरच्या बाळंतपणाची विशेष काळजी घेतली आहे.

यंदा तरी गोड बातमी आहे की नाही, अशी उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबईकरांना पेंग्विनच्या एका जोडीने खूशखबर दिली आहे. भायखळय़ाच्या जिजामाता उद्यानात पालिकेने आणलेले पेंग्विन इथल्या वातावरणात आणि उद्यानातील विशेष कक्षात चांगलेच रुळले आहेत. पेंग्विनच्या तीन जोडय़ांनी या
विशेष कक्षात जणू आपला संसारच थाटला होता.

या पेंग्विनच्या जोडय़ा आणि त्यांचे नखरे, त्यांच्या भावभावना, त्यांचे प्रेम, भांडणे, खेळणे हे सारे पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करत होते. आपापले जोडीदार शोधल्यानंतर आता पाळणा कधी हलणार अशी उत्सुकता येथील कर्मचाऱ्यांना, प्रसारमाध्यमांना, मुंबईकरांना लागून राहिली होती.

बाळंतपणाची गुप्तता

जिजामाता उद्यानातील कर्मचाऱयांनी फ्लिपरच्या गर्भधारणेबद्दल गुप्तता पाळली होती. पेंग्विन पक्ष्याचे हे पहिलेच बाळंतपण अनुभवत असल्यामुळे त्यांची देखभाल करणाऱयांनीही अभ्यास सुरू केला आहे. फ्लिपरला खाऊपिऊ घालणे, तिची काळजी घेणे आणि त्यांना त्रास न देणे ही पथ्ये पाळली जात आहेत. पेंग्विनच्या जोडय़ांमध्ये संबंध आल्यानंतर दीड महिन्याने मादी अंडं घालते. या अंडय़ातून पिल्लू येण्यास ४० दिवस लागतात, मात्र योग्य पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पडली तरच गर्भधारणा होते. त्यामुळे सध्या तरी येथील कर्मचाऱयांनी बाळंतपण सुखरूप पार पाडण्यासाठी धावा सुरू केला आहे.

आलटून पालटून पालकत्वाची जबाबदारी

फ्लिपर आणि मोल्ट हे दोघेही आतापासूनच जबाबदार आईबाबांसारखे वागू लागले आहेत. दोघेही आलटून पालटून अंडय़ाला ऊब देण्याचे काम करतात. या अंडय़ाच्या बाबतीत दोघेही खूप पझेसिव्ह असल्याचे निरीक्षण येथील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. कोणालाही आपल्या घरटय़ाजवळ ते येऊ देत नाहीत, असेही ते म्हणाले.

४० दिवसांची प्रतीक्षा

पेंग्विनच्या अंडय़ातून प्रत्यक्ष पिल्लू बाहेर येण्यास ४० दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे नर की मादी हे मात्र दीड महिन्यानेच कळू शकणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.