चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दगडाने ठेचून केला खून, पतीच झाला फिर्यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हातकणंगले

चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवानघेवाणीवरुन घुणकी येथील एकाने पत्नीची दगडाने ठेचून खून केला. ही घटना वाठार (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण (32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. आदम गौस पठाण (37) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदम पठाण व बिस्मिल्ला यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दोघात चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवानघेवाणीवरून वारंवार वाद होत होता. बिस्मिल्ला पठाण ही पती त्रास देत असल्याबद्दल वडगाव पोलिसात तक्रार देण्यासाठी गुरुवारी सायंकाळी आली होती. पतीचे एका महिलेशी संबंध असून तो मला जीवे मारण्याची धमकी देत असल्याबाबत पोलिसांना सांगितले. या प्रकरणी बिस्मिल्ला हिने पोलिसात तक्रारही दिली आहे. यानंतर दोघांची समजूत काढून वाद करू नका असे बजावून पोलिसांनी आदमवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन दोघांना घरी पाठवले. पोलीस ठाण्यातून रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरून आदम व बिस्मिल्ला हे दाम्पत्य घुणकीकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान वडगाव- वाठार रोडवर सिमेंट फॅक्टरीजवळ दोघांच्यात जोराचा वाद झाल्याने आदमने दगडाने बिस्मिल्ला हिला मारहाण केली यातच तिचा मृत्यू झाला.

आदमने घुणकी येथे जाऊन मी खून केल्याची माहिती गावातील लोकांना दिली असता त्यांनी तू पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दे असे सांगितले. त्यानंतर आदम वडगाव पोलिसात हजर होऊन खून केल्याची कबुली देऊन स्वतः फिर्याद दिली. पोलिसांनी आदमला तत्काळ अटक करून घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून पहाटे मृतदेहाचे शवविच्छेदन नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

बिस्मिल्ला या घुणकी गावात बांगड्याचे दुकान व मार्केटिंग कंपनीचे काम करत होत्या. तर आदम हा इचलकरंजी येथे खाजगी कंपनीत काम करत होता. बिस्मिला यांच्या मागे पत्ती आदम सासू सासरे दोन मुलगे असा परिवार आहे. तिच्या मृत्युची बातमी कळताच नातेवाईकानी घटनास्थळी धाव घेतली. घुणकी येथे काही काळ तणावाचे वातावरण झाल्याने महिला पोलिसासह बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजता बिस्मिल्ला यांचा मृतदेह दफन करण्यात आला अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करत आहेत.