हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी

तेलंगणा येथील 27 वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणाऱ्या चार आरोपींच्या एन्काऊंटरप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात बुधवार, 11 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

ऍड. जी. एस. मणी आणि प्रदीपकुमार यादव यांनी या एन्काऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. एन्काऊंटरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने 2014 साली मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, मात्र या एन्काऊंटरमध्ये पोलिसांनी या सूचनांचे पालन केले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे तेलंगणा उच्च न्यायालयाने चारही आरोपींचे मृतदेह 13 डिसेंबरपर्यंत देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले असून याप्रकरणी उच्च न्यायालयात 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

जया बच्चन, स्वाती मालीवाल यांच्यावरही कारवाईची मागणी

हैदराबाद एन्काऊंटरमध्ये सहभागी पोलिसांचे समर्थन करणाऱ्या खासदार जया बच्चन आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऍड. एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.

एन्काऊंटरप्रकरणी 2014 साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सूचना

  • एन्काऊंटरनंतर एफआयआर दाखल होणे आवश्यक; मृत्यू झालेल्या किंवा जखमी आरोपींच्या कुटुंबाला माहिती द्यावी.
  • एन्काऊंटरची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी तसेच या एन्काऊंटरची चौकशी सीआयडी किंवा अन्य पोलीस स्थानकामार्फत व्हावी.
  • एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या आरोपीविषयी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राज्य मानवाधिकार आयोगाला माहिती द्यावी.
आपली प्रतिक्रिया द्या