
अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला रविवारी झालेल्या न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. या त्याच्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात त्याने 5 गडी बाद करत करामत दाखवली. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या शमीने त्याच्या खिलाडूवृत्तीनेही चाहत्यांचे मन जिंकले आहे. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतरही संघाबाहेर असलो तर त्याचे दुःख नाही. आपल्या संघाच्या विजयाचा जल्लोष करायला हवा असे त्याने म्हणत खिलाडूवृत्ती दाखवली आहे. तसेच संघाबाहेर बसणं अवघड, पण संधी मिळल्यावर स्वत:ला सिद्ध करणारच, असा जबरदस्त विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
संघाकडून निवडलेल्या 15 खेळाडूंपैकी 11 जणांना खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे संघात खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आपल्या संघाच्या विजयाचा जल्लोष करायचा असे तो म्हणाला. मला 11 जणांसह खेळण्याची संधी मिळाली तर नक्कीच स्वतःला सिद्ध करेन. संघाबाहेर बसणं अवघड आहे. मात्र आपला संघाला विजयाची लय मिळाली आहे. सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अशावेळी संघाबाहेर असल्याचे दुःख करण्याऐवजी आपण निवडलेल्या संघात आहोत, हे महत्त्वाचे असून संघाचा विजय साजरा करायचा,असेही तो म्हणाला.
नेहमी सकारात्मक विचार केल्यास आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. आज संघात आहे, कदाचित उद्या नसेन. मात्र, त्यानंतर मी असेन, हे सुरूच राहते. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच आपल्या हातात असते, असेही त्याने सांगितले. मिळालेल्या संधीवेळी आता संघाची काय गरज आहे. आपली भूमिका काय आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, त्यामुळेच हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. खेळाची चांगली सुरूवात झाली आणि आपल्याला सुरुवातील काही गडी बाद करण्यात यश आले तर आपल्या संघाचे मनोबल उंचावते आणि त्याचा फायदा होतो. त्यामुळे सुरुवातीला गोलंदाजी करताना याचाही विचार करण्याची गरज असते, असेही तो म्हणाला.
























































