3 गावठी कट्टय़ांसह 9 काडतुसे जप्त;  नगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधून नगर शहरात गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तारकपूर बसस्थानकात पकडले आहे. त्याच्या ताब्यातून 3 गावठी कट्टे व 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला (वय 31, रा. खुरमाबाद, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

नगर जिह्यात मोठय़ा प्रमाणावर गावठी कट्टे आढळत असून, असे कट्टे बाळगणाऱयांवर कारवाई करण्याची मोहीम स्थानिक गुन्हे शाखेकडून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार सुरू आहे. दरम्यान तारकपूर बसस्थानकातील दुचाकी पार्ंकगजवळ एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला  कारवाई करण्यासाठी पाठविले.

पथकाने बसस्थानकाच्या पार्किंग परिसरात सापळा लावला असता, थोडय़ाच वेळात तेथे एक संशयित इसम आलेला दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेण्याची तयारी करताच तो पळून जाऊ लागला. मात्र, पथकाने त्यास पाठलाग करून पकडले. त्याने त्याचे नाव मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडील सॅकमध्ये गावठी बनावटीचे तीन कट्टे व नऊ जिवंत काडतुसे मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहेत. सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आर्म्स ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, कॉन्स्टेबल सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, मयूर गायकवाड व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.