देशभरातील महत्वाच्या घडामोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयटीआरबाबत संभ्रम

ज्यांना जुलै महिन्यात आयकर भरणा करता आलेला नाही त्यांना आता 31 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे, असा मेसेज फिरत आहे. अनेकांना मेसेज येत आहेत. या मेसेजमध्ये करदात्यांना कागदपत्रे कमी असल्याचे सांगण्यात येत असून त्यात एक लिंकही देण्यात येत आहे. परंतु, त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. ही आयटीआरच्या नावाखाली घोटाळेबाजांनी पाठवलेली लिंक असू शकते असा इशारा प्राप्तिकर विभागाने दिला आहे. आयटीआर भरणा करण्याची तारीख 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याची अधिसूचना बनावट असून प्राप्तिकर विभागाने अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.

एआय चॅटबॉचवर आता व्हाईस मेसेज

व्हॉट्सऍप आपल्या युसर्जसाठी एक मजेशीर फीचर आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपवर आलेल्या एआय चॅटबॉटसाठी हे फीचर आहे. या नव्या फीचरमुळे युजर्संना एआय चॅटबॉटसोबत व्हॉईस मेसेज शेअर करता येईल. सध्या बीटा टेस्टिंगसाठी फार थोडय़ा अँडॉईड मोबाईलवर ‘मेटा एआय- व्हॉईस मेसेज’ सेवा सुरू झालीय. येत्या आठवडय़ात सर्व मोबाईलवर ही सुविधा उपलब्ध होईल. एआय चॅटबॉटवर आतापर्यंत फक्त टेक्स्ट मेसेज पाठवता यायचा. मात्र आता मेटा एआय तुमच्या मेसेजला उत्तरही देईल. युजर्स चालतानाही व्हॉईस मेसेज पाठवू शकतो.

बछड्यांना उडवणारी ‘ती’ रेल्वे जप्त

भोपाळच्या जंगलातून जाणाऱया रेल्वेने वाघिणीच्या तीन बछड्यांना धडक दिली. या दुर्घटनेत एका बछडय़ाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन बछडे गंभीर जखमी झाले. या दोघांचा उपचारादरम्यान नुकताच मृत्यू झाला. वाघिणीने बछड्यांचा मृत्यू पाहून जंगलात रौद्र आक्रोश केला. हे बघून बचावासाठी आलेले वन अधिकारीही स्तब्ध झाले. या घटनेने अवघ्या जंगलावर शोककळा पसरली. ही घटना 14 जुलैच्या रात्री घडली होती. त्यानंतर आता वन अधिकाऱयांनी ज्या रेल्वेने वाघिणीच्या बछड्यांना ठार मारले, ती रेल्वे जप्त करण्याचे ठरवले आहे. याआधी 2020 साली आसाममध्ये एका हत्तीणीचा आणि तिच्या पिलाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला होता. तेव्हा आसामच्या वन अधिकारी यांनी रेल्वेचे इंजिन ताब्यात घेतले होते. तसेच रेल्वेचे पायलट आणि को पायलट यांना निलंबित करण्यात आले होते.

नाचताना शिक्षकाने सोडले प्राण

जयपूरमध्ये एका कार्यक्रमात नाचत असताना 45 वर्षीय शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मोठय़ा भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्षक आनंदाने नाचत होते. नाचत असताना अचानक ते जमिनीवर पडले आणि पुन्हा उठलेच नाहीत. शिक्षक खाली पडलेले पाहून लोकांनी लगेचच सुरू असलेला कार्यक्रम थांबवला.

मध्य रेल्वेची डॉक्टर-ऑन-कॉल सेवा

प्रवाशाला प्रवासादरम्यान एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तत्काळ मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘डॉक्टर्स-ऑन-कॉल’ ही सेवा सुरू केली आहे. ‘डॉक्टर-ऑन-कॉल’ टीमने 1 जून ते 31 जुलै या कालावधीत एकूण 2019 प्रवाशांना वैद्यकीय मदत दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका महिलेला लोणावळा येथून ट्रेन सुटली तेव्हा प्रसूती वेदना सुरू झाल्या. मध्य रेल्वे अधिकाऱयांनी तातडीने कारवाई केली आणि कर्जत येथे एक टीम तयार केली. महिलेला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिने एका सुखरूप बाळाला जन्म दिला.

श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन

श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने एसटीने उद्यापासून ‘श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एकमुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच 12 वर्षांच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे.

देश सोडणाऱयांची संख्या वाढली

मोदी सरकारच्या कार्यकाळात म्हणजेच गेल्या चार ते पाच वर्षांत सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणांना कंटाळून देश सोडणाऱयांची संख्या प्रचंड वाढल्याचे समोर आले आहे. देश सोडणाऱयांची संख्या वाढल्याची माहिती खुद्द परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी याबाबत राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाने खरेखुरे उत्तर दिले.
2019 मध्ये तब्बल 1,44,017 हिंदुस्थानींनी नागरिकत्व सोडल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. तर 2020 मध्ये 85256 लोकांनी, 2021 मध्ये 1,63,370 आणि 2022 मध्ये 2,25,620 लोकांनी नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला.