
विधान परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे-पाटील, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ. राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचे सभागृहात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर
विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. आमदार योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुलुंड मेट्रो दुर्घटना कंत्राटदाराला ५ कोटी दंड
मेट्रो मार्ग-४ प्रकल्पांतील मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मेट्रो व्हायाडक्टवर १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातप्रकरणी कंत्राटदाराला पाच कोटी तर सल्लागाराला एक कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय प्रकल्पाशी संबंधित प्राधिकरणातील तीन अभियांत्रिकी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती विधान परिषदेत लेखी उत्तरात देण्यात आली. मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत वाहनावर कठडा तुटून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई केली याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.





























































