
जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिह्यातील शाळा, अंगणवाडी शाळांसह गावांतील पाण्याचे 5276 नमुने घेतले होते. यापैकी 248 गावांतील 327 पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावांतील शाळा, अंगणवाडय़ांसह ग्रामपंचायतीला दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.
पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला दूषित पाण्याची तपासणी केली जाते. प्रत्येक गावातील वेगवेगळ्या स्रोतांवरील पाणी नमुने घेतले जातात. गत महिन्यात 5276 पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 248 गावांतील 327 ठिकाणचे पाणी दूषित आढळले. आटपाडी तालुक्यातील करगणी, दिघंची, गोमेवाडी, शेटफळे, करगणीसह 13 गावांमधील 14 पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. तसेच, जत तालुक्यातील संख, येळवी, माडग्याळ, उमदी, निगडी खुर्दसह 18 गावांमधील 20 पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस, बसाप्पावाडी, कोकळे, कुकटोळी, मोरगाव या पाच गावांतील पाच नमुने दूषित आढळले.
मिरज तालुक्यातील मालगाव, एरंडोली, खंडेराजुरी, सलगरे, कसबे डिग्रज, विजयनगर, कवठेपिरान, कवलापूर, भोसे, बुधगाव आदी 39 गावांतील 68 नमुने दूषित आले आहेत. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, बस्तवडे, सावळज, वायफळे, जरंडी आदी 16 गावांतील 24 पाण्याचे नमुने दूषित आल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी सेविकांना पाणी शुद्धीकरणाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना
दिल्या आहेत. वाळवा, शिराळा, खानापूर, कडेगाव तालुक्यांतही पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावांमधील शाळा, अंगणवाडीसह ग्रामपंचायतींना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.




























































