
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी या हंगामातील कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. तब्बल एक लाख साठ हजार गोण्या कांदा विक्रीसाठी बाजार समितीच्या आकारामध्ये दाखल झाला आहे. राज्यातील ही विक्रमी आवक आहे. आवक काढल्याचा परिणाम दरावर झाला असून, आधीच घसरलेले दर आणखीनच घसरले आहेत. देशांतर्गत मागणी स्थिर असताना काढलेली आवक ही दर घसरणी मागचे कारण आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली. जवळपास 740 ट्रक कांदा आवक झाल्याची माहिती समोर येत आहे. बाजारात सर्वत्र कांदाच कांदा असे चित्र दिसत होते. कांदा लिलावाच्या शेडसह भुसार बाजार तसेच पार्किंग भागातही कांद्याच्या गोण्या उतरवण्यात आल्या होत्या. सध्या उशिरा लागण केलेल्या खरीप कांद्याचा काढणी हंगाम सुरू आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव जिह्यासह कर्नाटकमधून कांद्याची आवक होत आहे. आवक काढल्याचा परिणाम दरावर झाला. शनिवारच्या तुलनेने प्रतिक्किंटल 200 रुपये ते 300 रुपये दरात घसरण झाली.
सुरू असलेल्या हंगामात कांद्याचे दर हे सुरुवातीपासूनच घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामध्ये ही आणखीन भर पडली आहे. बाजारांच्या जाणकारांच्या मते आणखीन काही दिवस बाजारात आवक अशीच राहण्याची शक्यता आहे.
15.19 लाख टन कांदा निर्यात
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेबर कालावधीत देशातून 15.19 लाख टन कांदा निर्यात झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीच्या तुलनेत 10 लाख 56 हजार टन कांदा निर्यात झाला होता. यंदा कांदा निर्यात 43 टक्क्यांनी अधिक आहे. आखाती देश, आग्नेय आशियाई देश आणि बांगलादेश, श्रीलंकेत हिंदुस्थानी कांद्याला चांगली मागणी आहे. एकूण देशांतर्गत व देशाबाहेरील एकूण मागणीच्या तुलनेत सध्या पुरेसा पुरवठा आहे. पुरवठय़ात तूट असली तरच शेतकऱयाला किफायती दर मिळतात, अशी माहिती शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांनी दिली आहे.





























































