
मुंबई उपनगरात वीज चोरांचा सुळसुळाट झाला आहे. वर्षभरात अदानी इलेक्ट्रिसिटीच्या भरारी पथकाने झोपडपट्टी परिसरात तब्बल 10 हजार 458 धाडी टाकल्या असून आढळलेल्या 386 प्रकरणांमध्ये वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांनी 21 कोटी 75 लाख रुपये किमतीच्या विजेची चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वीज चोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीकडून उपनगरातील सुमारे 27 लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र झोपडपट्टीतील वीज चोरीचे प्रमाण जास्त असल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीने प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे 25 भरारी पथकाच्या माध्यमातून वीज चोरांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार वर्षभरात 386 प्रकरणांमध्ये वीज चोरी झाल्याचे समोर आले आहे. तर वीज चोरीसाठी वापरलेल्या तब्बल 75 टन वायर्स जप्त केल्या आहेत.
n 2020-21 मध्ये 6 हजार 694 ठिकाणी धाडी टाकत 140 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली होती. यामध्ये 6 कोटी 85 लाख रुपये किमतीची वीज चोरी झाली होती. त्यातुलनेत यंदा 175 टक्क्यांची वाढ झाली आहे. n 2019-20 मध्ये 191 वीज चोरीची प्रकरणे समोर आली होती, तर 10 कोटी 39 लाख रुपयांची वीज चोरी झाली होती.
अजामीनपात्र गुन्हा
वीज कायदा कलम 2003 च्या कलम 135 नुसार वीज चोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यानुसार संबधित वीज चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरी न करता नियमानुसार वीज मीटर घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटीने केले आहे.
























































