Ind vs Aus मालिकेच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन मीडियाचे रवींद्र जडेजावर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वाद निर्माण झाला आहे. घाबरलेल्या ऑस्ट्रेलियन मीडियाने टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर चेंडूसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया संस्था फॉक्स क्रिकेटने जडेजाशी संबंधित एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

फॉक्स क्रिकेटने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक बाब समोर आली असून, त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये रवींद्र जडेजा बॉलिंग करण्यापूर्वी सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजकडे जातो आणि त्याच्याकडून बामसारखी वस्तू घेतो आणि बोटांना लावतो, असे या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांकडून चेंडूवर काहीही लावण्यास मनाई आहे आणि असे करणे बॉल टेम्परिंगच्या श्रेणीत येते. खरंतर व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजा असे काही करताना दिसत नाही. फुटेज पाहिल्यावर जडेजाने बोटांना आराम देण्यासाठी मलम लावल्याचे दिसून येते. जडेजाला बॉल टेम्परिंग करायचं असतं तर त्याने बॉलवर क्रीम लावलं असतं, मात्र ऑस्ट्रेलियन मीडियाने या प्रकरणाला विनाकारण वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

फॉक्स क्रिकेट नागपूर कसोटी सामन्यातून हिंदुस्थानी क्रिकेटची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्यांदा त्यांनी नागपूरच्या विकेटवरून टीकेची झोड उठवली. त्यानंतर फॉक्स क्रिकेटने उस्मान ख्वाजाविरुद्धच्या डीआरएस निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर त्यांनी रवींद्र जडेजाला बॉल टेम्परिंगच्या वादात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एकूण पाच विकेट घेतल्या. मात्र घाबरलेल्या ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या आरोपांमुळे मात्र टीम इंडिया चांगलीच दुखावली आहे.