
सामना ऑनलाईन । लंडन
हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी रात्री खेळला जाईल. कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा चित करत मालिकेत आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानकडे दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची नामी संधी आहे.
पहिल्या सामन्यामध्ये हिंदुस्थानने गोलंदाजी आणि फलंदाजीतही दमदार कामगिरी केली होती. चायनामन फिरकी गोलंदाजी कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनी इंग्लंडवर ‘यादवगिरी’ केली होती. कुलदीपने ५ बळी घेतले होते तर उमेशने दोन बळी घेत इंग्लंडच्या उधळलेल्या डावावर नियंत्रण मिळवले होते. फलंदाजीमध्ये सलामीवीर लोकेश राहुलने आक्रमक फलंदाजी करताना नाबाद शतक ठोकले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.
विजयी षटकार लगावण्याची सुवर्णसंधी
हिंदुस्थानी संघाकडे दुसरा सामना जिंकून सलग सहा टी-२० मालिका जिंकण्याची कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्थानचा विजयरथ न्यूझिलंडसोबत २०१७मध्ये झालेल्या टी-२० मालिकेपासून अविरतपणे सुरू आहे. तेव्हापासून हिंदुस्थानने एकही द्वीपक्षीय मालिका गमावलेली नाही.



























































