
पहिल्या डावात 78 धावांमध्ये गारद झालेला हिंदुस्थानचा क्रिकेट संघ लीड्स येथील तिसऱया कसोटीतील दुसऱया डावात झुंजताना दिसला. इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा फटकावत हिंदुस्थानवर 354 धावांची आघाडी मिळवली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा टीम इंडियाने 2 बाद 190 धावा केल्या होत्या. रोहीत शर्मा 59 धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजाराने शानदार खेळी साकारली.
इंग्लंडने 8 बाद 423 या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली. इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर संपुष्टात आला. व्रेग ओव्हर्टनने 32 धावा केल्या. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
हिंदुस्थानच्या दुसऱया डावाची सुरुवात सावध झाली. लोकेश राहुल व रोहीत शर्मा यांनी 34 धावांची भागीदारी केली. पण व्रेग ओव्हर्टनच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल 8 धावांवर जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद झाला आणि जोडी तुटली. त्यानंतर रोहीत शर्माने चेतेश्वर पुजाराच्या साथीने 82 धावांची भागीदारी केली. ओली रॉबीनसनच्या गोलंदाजीवर रोहीत शर्मा 59 धावांवर पायचीत बाद झाला.




























































