हिंदुस्थान गाठेल 8 टक्क्यांहून जास्त विकास दर, निती आयोगचे उपाध्यक्षांचे मत

35
rajiv-niti-ayog

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

हिंदुस्थानने आपल्या आर्थिक धोरणांमध्ये जे पायाभूत बदल केले आहेत, त्याचा परिणाम म्हणून 2020-21मध्ये हिंदुस्थान 8 टक्क्यांहून जास्त आर्थिक विकास दर गाठेल, असा आशावाद नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात शाश्वत विकासासाचे लक्ष्य गाठण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्याला जगातील नामवंत अर्थतज्ञ उपस्थित होते. या बैठकीनंतर अमेरिकेतील हिंदुस्थानी वकिलातीत ‘इंडिया इन्व्हेस्टमेंट सेमिनार’ या विषयावर त्यांनी विचार मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल, असे म्हटले होते. त्यावर बोलताना कुमार म्हणाले,‘हिंदुस्थानच्या आर्थिक धोरणात जीएसटी आणि दिवाळखोरीविरोधी कायदा या सारखे पायाभूत सुधारणा करण्यात आल्या आहेत. याचे फायदे येत्या काळात दिसणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थान सात नाही तर आठ टक्क्यांहून जास्तीचा विकासदर गाठेल,’ असे ते म्हणाले.

म्हणून मोदींना पुन्हा निवडून दिले

गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण झाले आहेत. सुशिक्षित आणि उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नोकऱया मिळत नाहीत, याची खंत आहे, असे सांगत नरेंद्र मोदी सरकारने अनेक पातळीवर काम केले, त्याची पोचपावती म्हणूनच लोकांनी मोदींना पुन्हा निवडून दिले आहे, असेही कुमार म्हणाले.

खासगी गुंतवणुकीवर भर

गुंतवणुकीसाठी योग्य ते वातावरण तयार करून खासगी गुंतवणूक वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर कोळसा, खनिजे, खाणी या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला वाव दिला जाणार आहे. समाजातील तळागाळातील लोकांना नव्या आर्थिक धोरणाचे फायदे पोहोचावेत, यासाठी सामाजिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. शाश्वत आर्थिक विकासाबरोबरच इतर आर्थिक लक्ष्यही वेळेआधी आम्ही पूर्ण करू, असेही कुमार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या