‘जीडीपी’ 5.8 टक्के; बेरोजगारी दर 6 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशाचा आर्थिक विकास दर जीडीपी 5.8 टक्क्यांपर्यंत खाली आला असून  हा पाच वर्षातील निच्चांक आहे. तसेच 2017-18 या आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर गेला. हा 45 वर्षांतील रेकॉर्ड असल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2018-19 आर्थिक वर्षात जीडीपी (सकल घरेलू उत्पादन) 6.6 टक्के होता. मात्र आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च या काळात जीडीपीचा दर 5.8 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. पाच वर्षांतील हा सर्वात कमी जीडीपी दर आहे. 2013-14 मध्ये देशाचा जीडीपी 6.4 टक्के होता.

बेरोजगारी वाढली

एकीकडे जीडीपी घसरला असताना बेरोजगारीही वाढली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षातील बेरोजगारीचे आकडे सरकारने जाहीर केले. त्यानुसार 2017-18 मध्ये बेरोजगारी 6.1 टक्क्यांवर पोहचली आहे. गेल्या 45 वर्षांतील ही देशातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. पुरुष 6.2 टक्के ते महिला 5.7 टक्के बेरोजगार आहेत. शहरात हे प्रमाण 7.8 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के आहे.