गर्भलिंग चाचणीवरील निर्बंध हटवण्यात यावेत, IMAच्या अध्यक्षांच्या विधानाने वादाची शक्यता

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आर. व्ही. अशोकन यांनी भ्रूण हत्येसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद उद्धवण्याची शक्यता आहे. अशोकन यांनी गर्भलिंग चाचणीवरील निर्बंध हटवण्यात यावेत, असं विधान केलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अशोकन यांनी हे विधान केलं आहे.

अशोकन यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार, असोसिएशन सध्या प्री कन्सेपश्न आणि प्री नेटल डायग्नॉस्टिक टेक्निक अॅक्ट संदर्भातील बदलांसाठी एक अहवाल तयार करत आहे. सध्याचा कायदा हा गर्भलिंग चाचणीवर निर्बंध घालतो. आणि तसं केल्यास डॉक्टरांना जबाबदार धरतो. पण, आम्ही यात एक छोटा बदल सुचवू इच्छितो की भ्रूणाच्या लिंगाचा शोध घेण्यात यावा आणि स्त्री अर्भकाच्या जिवाला संरक्षण पुरवावं.

स्त्री भ्रूण हत्या हा एक सामाजिक प्रश्न आहे, त्यामुळे त्याचं उत्तर वैद्यकीय क्षेत्रात शोधता येणार नाही. सामाजिक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं, स्त्रीभ्रूण हत्या रोखल्या तरी जन्माला आल्यानंतर स्त्री अर्भकांची हत्या होतच राहणार. आम्ही सांगतोय त्यानुसार जर बदल केले तर गर्भातील बाळाला जर एखादा आजार असेल तर त्याच्यावर जन्मल्याच उपचार करणं सोपं होईल. गर्भलिंग चाचणीवरील प्रतिबंधामुळे अनेक अडचणी येतात. सगळेच डॉक्टर अशा प्रकारे चाचणी करून स्त्रीभ्रूण मारतील, असं समजणं योग्य नाही, असं अशोकन यावेळी म्हणाले. अशोकन यांच्या या विधानामुळे आता नवीन चर्चा सुरू झाली असून त्यांच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे.