
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयासमोर दाखल केला आहे. सदर माहितीपट येत्या 23 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सीबीआयच्या अर्जाची दखल घेऊन विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. नाईक-निंबाळकर यांनी नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडिया आणि अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आणि सुनावणी 20 फेब्रुवारीला निश्चित केली.
सीबीआयच्या वतीने सरकारी वकील सी.जे.नांदोडे यांनी शनिवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ या माहितीपटामध्ये शीना बोरा हत्याकांडातील आरोपीं आणि खटल्याशी संबंधित व्यक्तींना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे खटला न्यायालयाप्रविष्ट असेपर्यंत हा माहितीपट प्रदर्शित करू नये, अशी मुख्य मागणी अर्जामध्ये करण्यात आली आहे.
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा वाहनचालक शामवर रायला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान या हत्याकांडाचा साल 2015 मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि 25 एप्रिल 2015 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी इंद्राणीसह राय, खन्ना आणि पीटर मुखर्जीही जामिनावर बाहेर आहेत.
























































