इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनतर्फे 14व्या इन्फोसिस प्राइज पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन (ISF) ने आज इन्फोसिस प्राइज 2022 च्या विजेत्यांची घोषणा केली. इंजिनीअरिंग अॅण्ड कम्प्युटर सायन्स, ह्युमॅनिटीज, लाईफ सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस या सहा विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारकर्मींनी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात कामगिरी करत अवघ्या हिंदुस्थानावर साधलेल्या परिणामाचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत इन्फोसिस प्राइजतर्फे हा पुरस्कार दिला जातो. सुवर्णपदक, मानचिन्ह आणि 100,000 डॉलर (किंवा हिंदुस्थानीय रुपयांमधील त्या प्रमाणातील रक्कम) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बंगळुरुतील इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनच्या नव्या कार्यालयात हा पुरस्कार सोहळा पार पडला.

जगविख्यात विद्वान आणि तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने 218 नामांकनांमधून इन्फोसिस प्राइज 2022 च्या विजेत्यांची निवड केली. मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरतील अशा सर्वोत्कृष्ट आणि सर्जनशील वैज्ञानिक संशोधनाचा इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन (आयएसएफ) तर्फे मागील तेरा वर्षांपासून सन्मान केला जातो. या अतुलनीय संशोधनाची दखल घेताना आयएसएफ फक्त वैयक्तिक यश साजरे करत नाही तर त्याचसोबत तरुण पिढीला विज्ञान आणि संशोधन हा करिअरचा पर्याय म्हणून निवडण्यासाठी प्रोत्साहनही देते. इन्फोसिस प्राइज विजेत्यांमध्ये दोन नोबेल पुरस्कार विजेते, दोन फिल्ड्स मेडल विजेते, मॅकआर्थर फेलो आणि सरकार तसेच शिक्षण क्षेत्रात उच्च पदांवर असलेल्या अनेक व्यक्तींचा समावेश आहे.

या कार्यक्रमात इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचे विश्वस्त क्रिस गोपालकृष्णन, नारायण मूर्ती, श्रीनाथ बटनी, के. दिनेश, मोहनदास पै, सलिल पारेख आणि एस.डी. शिबुलाल हे मान्यवर उपस्थित होते.

इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष क्रिश गोपाळकृष्णन म्हणाले, “विविध विद्वानांना वैयक्तिक पातळीवर पुढे आणत आणि त्यांचा सन्मान करून इन्फोसिस प्राइज हिंदुस्थानातील उत्कृष्ट संशोधनाला चालना देत आहे. आमच्या या पुरस्कार विजेत्यांनी एकूणच मानवी ज्ञानात भर घातली आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या कामाचा प्रत्यक्ष जीवनातही अनेक ठिकाणी परिणाम जाणवतो. आपल्या पुढील सध्याची आव्हाने पेलण्यात त्यांच्या या कार्याचे दूरगामी साह्य लाभेल अशी आम्हाला आशा आहे. त्याचसोबत, हवामान बदल, निदान चाचण्या आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, मानसिक आरोग्याचे आव्हान, मूलभूत मानवी हक्कांची पूर्तता आणि मानवतेसमोर उभ्या अशा इतर आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी यातून नवा मार्ग आखला जाईल, अशीही आशा आम्हाला वाटते.”

इन्फोसिसचे संस्थापक आणि इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचे विश्वस्त नारायण मूर्ती यांनी हिंदुस्थानातील विज्ञान आणि संशोधनाला आर्थिक बळ देण्याचे महत्त्व विषद करताना म्हटले, “विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात सरकारी आणि खासगी क्षेत्रातून अधिक गुंतवणूक केली जाणे ही फार तातडीची गरज आहे. राष्ट्र आणि एकुणच मानवतेसमोर उभ्या ठाकलेल्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आपल्यासमोर आहे. आपल्या या भव्य समस्यांसोबतच्या युद्धात आपले संशोधक म्हणजे राष्ट्रासाठी पहिल्या फळीत लढणारे सैनिक आहेत. म्हणूनच आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. आजघडीला देश आणि जगापुढे ज्या भयानक समस्या उभ्या ठाकल्या आहेत त्यावर तोडगा शोधण्याच्या कार्यात या इन्फोसिस प्राइज विजेत्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे.”

सहा विभागांमधील इन्फोसिस प्राइज 2022 विजेते:
इंजिनीअरिंग अॅण्ड कम्प्युटर सायन्स
इंजिनीअरिंग अॅण्ड कम्प्युटर सायन्स विभागातील इन्फोसिस प्राइज 2022 या पुरस्काराचे विजेते आहेत खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे डीन आणि मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती. फ्लुईड मॅकेनिक्समधील इंटरअॅक्शन विषद करणे, इंटरफेशिअल फिनोमीना आणि मायक्रो आणि नॅनोस्केलवरील इलेक्ट्रोमेकॅनिक्स यातील अग्रणी कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या संकल्पना मांडून नव्या कमी दरातील सेन्सिंग, निदान आणि उपचारात्मक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देत त्यांनी मर्यादित स्रोते असलेल्या ठिकाणीही आधुनिक आरोग्यसेवा देऊ करण्यात मोलाची भर टाकली आहे.

ह्युमॅनिटीज
ह्युमॅनिटीज विभागातील इन्फोसिस प्राइज 2022 हा पुरस्कार बंगळुरुतील नॅशनल लॉ स्कुल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीचे कुलगुरु सुधीर कृष्णस्वामी यांना प्रदान करण्यात आला आहे. हिंदुस्थानीय संविधानाचा सखोल अभ्यास, विशेषत: 1973 मध्ये सुप्रीम कोर्टाने अवलंबलेल्या ‘बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरिन’ म्हणजेच मूलभूत रचना सिद्धांत या महत्त्वाच्या निर्णयाचे महत्त्व विषद करणारा, अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी मांडलेला युक्तिवाद यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या निर्णयात सुधारणा करण्यासंबंधी त्यांच्या अभ्यासातून मार्गदर्शन मिळते आणि त्यातील प्रतिबंधित मुद्देही अधोरेखित होतात. शिवाय, हिंदुस्थानाच्या राजकीय पटलावरील विविध कार्यरत आणि वैधानिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची स्थिरता त्यामुळे जपली जाते.

लाईफ सायन्सेस
लाईफ सायन्सेससाठीचा इन्फोसिस प्राइज 2022 पुरस्कार मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधील बायोलॉजिकल सायन्सेसच्या अध्यक्ष आणि प्रोफेसर विदिता वैद्य या देण्यात आला. चिंता आणि नैराश्य यासारख्या मूड डिसॉर्डर तसेच आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्यात ताण आल्याने वर्तनात सातत्याने बदल घडवण्यास कारणीभूत न्युरोट्रान्समीटर सेरोटोनिनमुळे मिळणारे संदेश आणि मेंदूच्या पेशींमधील ऊर्जेच्या नियमनात सेरोटोनिनचा सहभाग यातील मेंदूचे कार्य समजून घेण्यात त्यांनी मूलभूत अभ्यास केला आहे. जागतिक महासंकटानंतरच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक ठळक आणि अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. वैद्य यांचे हे कार्य फारच सुसंगत ठरते.

मॅथमॅटिकल सायन्सेस
इन्फोसिस प्राइज 2022 मधील मॅथमॅटिकल सायन्सेस विभागाचा पुरस्कार बंगळुरुतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर महेश काकडे यांना प्रदान करण्यात आला. बीजगणितीय संख्या सिद्धांतातील त्यांच्या लक्षणीय सहभागासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. नॉन-कम्युनिकेटिव्ह इवासवा मुख्य अनुमान यातील त्यांचे सखोल कार्य, ग्रॉस-स्टाई अनुमानातील कार्य (समित दासगुप्ता आणि केविन वेंटुलो यांच्यासोबत) आणि आधुनिक सांख्यिक सिद्धांताच्या मुळाशी असलेले अनोखे अनुमान सोडवणे यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. बीजगणितातील राणी समजल्या जाणाऱ्या अंक सिद्धांतात अंकांमधील संबंधांचा अभ्यास केला जातो आणि क्रिप्टोग्राफीसारख्या क्षेत्रांमध्ये या अभ्यासाचा प्रत्यक्ष वापर करता येतो.

फिजिकल सायन्सेस
फिजिकल सायन्सेस विभागातील इन्फोसिस प्राइज 2022 हा पुरस्कार पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिया अॅस्ट्रॉनॉमीचे प्रोफेसर निस्सिम काणेकर यांना प्रदान करण्यात आला. तथाकथित ‘हाय नून’ काळ म्हणजेच जेव्हा तारे सर्वाधिक वेगाने निर्माण होतात, त्या काळात आकाशगंगांचा त्यांना अभ्यास केला आहे. तसेच स्वतंत्रपणे, त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या खगोलशास्त्रीय संशोधनामुळे इलेक्ट्रॉन ते प्रोट्रोन वस्तूमान गुणोत्तर आणि सुक्ष्म रचना स्थिरांकाच्या संभाव्य ऐहिक बदलांची सर्वाधिक मर्यादा मांडली गेली. प्राध्यापक काणेकर यांच्या या कार्यामुळे हिंदुस्थानाच्या रेडिओ खगोलशास्त्रीय क्षमतांना जागतिक नकाशावर स्थान मिळाले.

सोशल सायन्सेस
सोशल सायन्सेस विभागातील इन्फोसिस प्राइज 2022 हा पुरस्कार येल युनिव्हर्सिटीतील इकॉनॉमिक ग्रोथ सेंटरच्या संचालिका आणि अर्थशास्त्राच्या हेन्री जे. हाइन्स II प्रोफेसर रोहिणी पांडे यांना प्रदान करण्यात आला. प्रशासन आणि उत्तरदायित्व, महिलांचे सक्षमीकरण, गरिबांच्या आयुष्यात कर्जाचे महत्त्व आणि पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयांमधील अतुलनीय अभ्यासासाठी त्यांची निवड झाली आहे. विविध अभ्यासपद्धतींचा वापर करून त्यांनी काढलेले अनुभवसिद्ध निष्कर्ष हिंदुस्थानासह इतर विकसनशील अर्थव्यवस्थांमधील धोरणांच्या निश्चितीसाठी महत्त्वाचे असे खात्रीशीर मार्ग आणि त्यातील क्षमता विषद करतात. बदलत्या हवामानाचे आव्हान, सामाजिक न्याय त्याचप्रमाणे न्याय्य आणि समानता जपणारा समाज असे मुद्दे महत्त्वाचे ठरत असताना प्रा. पांडे यांच्या कार्याचे परिणाम लक्षणीय ठरतात.