माझा आवडता बाप्पा! ।। गुरुबिन ग्यान कहांसे पाऊ ।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ गायक रघुनंदन पणशीकर खऱ्या अर्थाने गुरुपंथी आहेत. गाणं आणि अध्यात्मात ते गुरूंनी दाखविलेल्या वाटेवरूनच निघाले आहेत.

  • आपलं आवडतं दैवत? – आम्ही गुरुपंथी आहोत. राघवेंद्र स्वामी हे आमचं दैवत आहे.
  • त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – ते संगीतकार होते. त्यांनी समाधी घेऊन साडेतीनशे वर्षे झाली अजूनही भक्तांना ते प्रत्यय देतात. ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले… मला हे दत्तगुरू दिसले’ या गाण्याद्वारे त्यांचं कौतुक करायला आवडतं.
  • संकटात ते तुम्हाला कशी मदत करतात, असं वाटतं? – भक्तांनी त्यांना पाहिलेलं नसलं तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते भक्तांना करून देतात. तुमच्या आयुष्यातल्या समस्या मी काढून टाकीन याची हमी ते देतात.
  • कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – देव ही संपूर्ण विश्वाला चालवणारी शक्ती आहे. ही शक्ती म्हणजेच माझ्यासाठी राघवेंद्र स्वामी आहेत,असे मी मानतो. कलेने मनोरंजन होत असलं तरीही तो कलाकारासाठी आत्मपरिक्षणाचा मार्ग आहे. कलेसोबत विद्याही जोडलेली असते.
  • तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्यांची कशी मदत होते? – गायक कलाकाराला रागदारी माहित असली तरीही दरवेळी जे जे घडतं ते फक्त त्याच्या कृपेनेच घडत असतं यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. कारण प्रत्येक वेळी एखाद्या रागाचं वेगळं स्वरुप दिसतं. एकच राग दरवेळी गाताना त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात येतात. कलेची दृष्टी तोच देतो कलाकाराला मेहनत घ्यावी लागते.
  • आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग? – माझ्या तब्येतीच्या अडचणी होत्या. त्यावेळी राघवेंद्र स्वामींची दीक्षा मला किशोरीताईंनी दिली. त्यानंतर आजपर्यंत माझी शस्त्रक्रिया झालीय हे कधी आठवतही नाही.
  • त्यांच्यावर रागावता का? – खूप नाही, पण माझ्यासाठी स्वामी म्हणजे मित्र, आई-वडील आहेत. वेळप्रसंगी त्यांच्याकडे भांडतो, मनातलं सगळं सांगतो. थोडसं रागवून किंवा कधी कधी प्रेमानेही बोलतो. आर्जवही करतो. पालनकर्ता या भावनेने त्यांच्याकडे बघतो.
  • ते तुमचे लाड कसे पुरवतात? – त्यांच्या कृपेमुळेच मी जगतोय. हे त्यांचे लाडच आहेत.
  • त्यांचे कोणतं स्वरूप आवडतं? – ते अत्यंत दयाळू आहेत. त्यांना समस्या सांगितल्यावर आपोआप सुटली आहे हे लक्षात येतं.
  • त्यांच्यापाशी काय मागता? – मला नेहमी असं वाटतं की, आमचे सूर म्हणजेच राघवेंद्र स्वामी आहेत. त्यामुळे त्या रुपातच त्यांनी मला दर्शन द्यावं. असं एखादं तरी गाणं माझ्याकडून व्हावं की, माझ्या गाण्यातील ईश्वरी शक्तीचा अनुभव लोकांनी डोळे बंद करून घ्यावा.
  • त्यांच्या आवडीचा नैवेद्य काय दाखवता? – जो मनापासून दाखवला जाईल तो नैवेद्य.
  • त्यांची नियमित उपासना कशी करता?– त्यांच्या स्त्रात्राचं पठण करतो. राघवेंद्र स्वामी महोत्सवही साजरा करतो. हा कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही.- रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायक