IPL 2021 – नॉर्खियाला कोरोना, रबाडाचेही खेळणे संदिग्ध; दिल्ली कॅपिटल्स संघाची चिंता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्खियाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पॅगिसो रबाडाही त्याच्यासोबत सात तास विमान प्रवासात होता, मात्र पॅगिसो रबाडाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

एन्रीच नॉर्खिया आणि पॅगिसो रबाडा हे दोघेही दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू मुंबईमध्ये क्वारंटाइन आहेत, मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएल प्रशासनाकडून अद्यापि याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याअगोदर दिल्ली पॅपिटल्सचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यालाही कोरोनाची लागण झालेली आहे.

कोलकाता आणि बंगळुरू संघालाही कोरोनाचा फटका

आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा नितीश राणा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा देवदत्त पडीक्कल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र नितीश राणाने नुसतीच कोरोनावर मात केली नाही, तर कोलकाता संघासाठी सलग दोन सामन्यांत अर्धशतकेही ठोकली आहेत.

पहिल्या सामन्यात अनुपस्थिती

बीसीसीआयच्या करोना प्रोटोकॉलनुसार एखादा खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास तो निगेटिव्ह येईपर्यंत किमान 10 दिवस क्वारंटाइन असणे आवश्यक आहे. एन्रीच नॉर्खिया गेल्या मंगळवारी मुंबईत दाखल झाला आणि त्याने सात दिवसांचा अनिवार्य क्वारंटाइन कालावधीही पूर्ण केला. म्हणूनच तो दिल्लीचा यंदाच्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नाही. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 7 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला होता.

पाकिस्तानविरुद्ध खेळून आले सोबत

एन्रीच नॉर्खिया आणि पॅगिसो रबाडा हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू 4 एप्रिलला जोहान्सबर्ग येथे पाकिस्तानविरुद्ध दुसरा वन डे सामना खेळून 5 एप्रिलला आयपीएलसाठी हिंदुस्थानमध्ये आले आहेत. 6 एप्रिलला दिल्ली पॅपिटल्स संघात दाखल होऊन बीसीसीआयच्या नियमानुसार 7 दिवस क्वारंटाइन झाले आहेत. मात्र 12 एप्रिलला एन्रीच नॉर्खियाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पॅगिसो रबाडाची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी विमान प्रवासात दोघे 7 तास एकत्र असल्यामुळे रबाडालाही लवकर संघात दाखल होता येईल असे वाटत नाही.