IPL 2024 : बंगळुरूला आशा फिनिक्सभरारीची! हैदराबादविरुद्ध विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार

स्टार खेळाडूंनी सजलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या तळाला आहे. सहापैकी केवळ एकच विजय मिळविता आल्याने या संघाच्या ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीची वाट खूप बिकट झाली आहे. आता राखेतून उठून फिनिक्सभरारी घेण्यासाठी या संघाला उद्या हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वस्व पणाला लावावे लागेल. दुसरीकडे ‘आयपीएल’च्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानी असलेल्या हैदराबादलाही प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता एक-एक विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे बंगळुरू-हैदराबाद संघांत उद्या एक तुल्यबळ लढत बघायला मिळेल.

विराट कोहली, कर्णधार फाफ डय़ु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक अशा स्टार खेळाडूंनी सजलेल्या बंगळुरू संघाला आयपीएलच्या 17 व्या हंगामात पराभवामागून पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईविरुद्धच्या मागील लढतीत बंगळुरूने 196 धावसंख्या उभारली, मात्र मुंबईच्या फलंदाजांनी 15.3 षटकांत विजयाला गवसणी घालून बंगळुरूची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. रीस टॉपली, मोहम्मद सिराज व अक्ष दीप यांच्यासह बंगळुरूच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. आयपीएलमध्ये सर्वाधिक 319 धावांसह ‘ऑरेंज पॅप’ बंगळुरूच्या विराट कोहलीकडे आहे, मात्र ‘फलंदाजांनी कमावले अन् गोलंदाजांनी गमावले, अशी बंगळुरू संघाची गत झाली आहे. या संघाला एक-एक पराभव प्ले ऑफच्या शर्यतीतून लांब घेऊन जाणार आहे. त्यामुळे सर्वच आघाडय़ांवर विशेषतः गोलंदाजीमध्ये बंगळुरूला कमालीचे परिवर्तन करून दाखवावे लागणार आहे.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाची भट्टी तशी मस्त जमलेली दिसतेय. त्यांच्याकडे हेन्रीक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रव्हिस हेड असे मॅचविनर फलंदाज आहेत. शिवाय कर्णधार पॅट कमिन्ससह भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन व शाहबाझ अहमद अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजीही हैदराबादच्या दिमतीला आहे. त्यामुळे या घडीला तरी हैदराबादचा संघ बंगळुरूपेक्षा थोडा सरसच वाटतोय. मात्र क्रिकेटमध्ये ज्याचा दिवस असतो तो संघ बाजी मारतो, हे आपण बघत असतो. त्यामुळे सोमवारच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.