IPL 2024 : महाराष्ट्राची पोरं चमकली; चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय

चेन्नईच्या विजयात ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांनी महाराष्ट्राचा डंका वाजवला. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराजने 54 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 98 धावांची खेळी. मात्र अवघ्या दोन धावांनी त्याचे शतक हुकले. तर, गोलंदाजी करताना तुषार देशपांडेने तुफान फॉर्मात असणारे हैदराबादचे ट्रेवीस हेड आणि अभिषेक शर्मा यांना तंबुचा रस्ता दाखवला. तुषारने 3 षटकांमध्ये 27 धावा देत 4 महत्वपुर्ण विकेट घेतल्या. चेन्नईच्या घातक गोलंदाजीमुळे हैदराबदचा संपुर्ण संघ 134 धावांवर बाद झाला.

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हैदराबादचा निर्णय फसला अस म्हणावे लागेल. कारण चेन्नइच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अजिंक्य रहाणे (12 चेंडू 9 धावा) स्वस्तात माघाली परतला. मात्र कर्णधार ऋतुराज आणि मिचेल यांनी संघाचा डाव सावरला. ऋतुराजचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. तर मिचेलने 32 चेंडूंमध्ये 52 धावांची महत्वपुर्ण खेळी केली. मिचेल बाद झाल्यानंतर शिवम दुबेने 20 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 39 धावांची खेळी केली. चेन्नईच्या फलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे चेन्नईने 212 धावा केल्या आणि हैदराबादला 213 धावांचे आव्हान दिले.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. हैदराबादची आक्रमक जोडी ट्रेविस हेड (7 चेंडू 13 धावा) आणि अभिषेक शर्मा (9 चेंडू 15 धावा) दोघांनाही तुषारने बाद केले. त्यानंतर आलेल्या अनमोलप्रितला तुषारने भोपळा सुद्धा फोडू दिला नाही. मार्करमने (26 चेंडू 32 धावा) एकाकी लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. तुषार देशपांडेने सर्वाधिक 4, मुस्तफिजुर रहमाण आणि पथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले. सलग दोन सामन्यांमध्ये लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादला पराभावाच सामना करावा लागला आहे.