
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धोनीवर (Mahendra Singh Dhoni) मॅच फिक्सिंगचा आरोप करणे आयपीएस अधिकाऱ्याला महागात पडले आहे. धोनीच्या तक्रारीनंतर या अधिकाऱ्याला मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. संपत कुमार (IPS officer G Sampath Kumar) असे या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर धोनीvs आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या प्रकरणात आता संपत कुमार यांना 15 दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने संपत कुमार यांना या शिक्षेविरोधात अर्ज करण्यासाठी 30 दिवसांचा अवधीही दिला आहे.
नक्की प्रकरण काय?
इंडियन प्रीमियर लीग 2013मध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाचा तपास करताना संपत कुमार यांनी धोनीचाही बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर धोनीने संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अवमान याचिका दाखल केली होती. धोनीने 2014मध्ये 100 कोटींची नुकसान भरपाई मागितली होती.
उच्च न्यायालयात काय घडलं?
धोनीच्या अवमान याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संपत कुमार यांना दोषी ठरवत 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी संपत कुमार यांना न्यायालयाने 30 दिवसांचा वेळ दिला आहे.
























































