
गेल्या काही काळापासून इराणमध्ये हिजाबच्या सक्तीविरोधात आंदोलन सुरू होतं. हिजाब परिधान न केल्याने इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांच्या मारहाणीत 22 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्युनंतर इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांच्या विरोधात संतापाचा डोंब उसळला. या पोलिसांच्या विरोधात इराणी महिला रस्त्यावर आल्या. अखेर दोन महिन्यांनंतर या महिलांच्या आंदोलनाला यश आलं आहे.
इराणच्या सरकारने संस्कृती रक्षक पोलीस पथक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणचे अॅटर्नी जरनरल मोहम्मद जाफ मोंटाझेरी यांनी या बाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, संस्कृतीरक्षक पोलीस हे पथक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा निर्णय कायमस्वरुपी आहे किंवा तात्पुरत्या स्वरुपासाठी आहे, याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही.
काही काळापूर्वी हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीला ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’नी अटक केली होती. अटक केल्यावर महिसाची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. महसाच्या मृत्यूनंतर संस्कृतीरक्षक पोलिसांची तिचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला पेटून उठल्या होत्या.
तर, महासाच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण केल्याचा आरोप केला होता. पण, इराणच्या सरकारने महसाशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाले नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर इराणमधील महिलांनी संस्कृतीरक्षक पोलिसांना विरोध करत हिजाब जाळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. जगभरातील कलाकार आणि खेळाडूंनीही हिजाबविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला होता.




























































